गॅरंटी हा केवळ तीन अक्षरांचा खेळ नव्हे, नरेंद्र मोदी यांचे वर्ध्यात प्रत्युत्तर

माझ्यासाठी गॅरंटी हा केवळ तीन (guarantee)अक्षरांचा खेळ नाही, अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले. वर्ध्यात झालेल्या एका प्रचारसभेत ते बोलत होते.

वर्धा : ‘संपूर्ण देश आज दृढ आत्मविश्वासाने ‘मोदींच्या गॅरंटी’चा स्वीकार करत आहे. अशी गॅरंटी देण्यासाठी हिंमत लागते, समर्पण भाव लागतो. संकल्प आणि विश्वासामुळेच, माझ्यासाठी गॅरंटी हा केवळ तीन अक्षरांचा खेळ नाही’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. ‘काँग्रेस आणि ‘इंडिया’चे विचार हे विकास आणि शेतकरीविरोधी आहेत. ‘बारशाला गेला आणि बाराव्याला आला’ असे त्यांचे काम आहे’, (guarantee)अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस आणि अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी तळेगाव (श्यामजी पंत) येथील प्रगती मैदानावर मोदी यांची प्रचारसभा झाली. यावेळी मोदी म्हणाले, ‘गुजरातसोबत वर्धा आणि अमरावतीचे विशेष नाते आहे. महात्मा गांधीजी गुजरातमध्ये जन्मले असले तरी त्यांची कर्मभूमी वर्धा आहे. आचार्य विनोबा भावे बराच काळ या भूमीत राहिले. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बापूंनी पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. २०१४पूर्वी या देशात काही चांगले होऊ शकते, हे कुणालाही शक्य वाटत नव्हते. सर्वत्र निराशा होती. गावांत रस्ते, पाणी, वीज येऊच शकत नाही, यावर लोकांचा विश्वास बसला होता. गरीब, शेतकरी कुटुंबांना हेच आपले प्राक्तन वाटायचे. आपले दु:ख कुणी समजून घेणार नाही, असे महिलांना वाटायचे. पण, आम्ही दहा वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. प्रत्येक गावात प्रकाश पोहचविला. अकरा कोटी लोकांना नळजोडण्या दिले. चार कोटी गरीब कुटुंबांना पीएम आवास योजनेतून घर मिळाले. ५० कोटींहून अधिक लोक बँकेशी जुळून अर्थव्यवस्थेचा भाग बनले.’

‘एनडीए सरकार समृद्धी महामार्ग, नागपूर-गोव्यादरम्यान एक लाख कोटींच्या खर्चातून ‘ग्रीन हायवे’ बांधत आहे. वर्धा, सेवाग्राम, पुलगाव, हिंगणघाटसारख्या क्षेत्रात उत्कृष्ट रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. दशकापासून अडकलेल्या सिंचन योजना सोडविल्या. अमरावतीचा संत्रा, वर्ध्याच्या हळदीला एक वेगळी ओळख दिली आहे. विदर्भ मागासलेपणाच्या चक्रातून बाहेर पडला आहे’, असे मोदी म्हणाले. व्यासपीठावर उमेदवारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे आदी उपस्थित होती.

हेही वाचा :

अधिकार, हक्क, मनासारखा लोकप्रतिनिधी निवडून

प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का

42 वर्षाच्या धोनीनं विराटसमोर ठेवला आदर्श