चोरी केली, थार घेतली अन् चुलत्याकडूनच कौतुक करून घेतले कोल्हापुरातील अजब चोरीचा पर्दाफाश

कोल्हापूर चुलत्याच्या घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून त्यातून नवी कोरी महिंद्रा थार गाडी खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, ज्या चुलत्याच्या घरातून सोन्याची चोरी केली, (Kolhapur) त्याच चुलत्याच्या हस्ते पुतण्याने नव्या गाडीचे पूजन करून घेतले. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय पुतण्या समर पोपट चव्हाण याच्यासह सोने खरेदी करणाऱ्या सोनाराला अटक केली आहे. अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.

सातवे येथील समर चव्हाण हा डिप्लोमा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. (Kolhapur) त्याच्या घराशेजारीच त्याचे चुलत चुलते उमेश मारुती चव्हाण यांचे कुटुंब राहते. नात्यातील जवळीक आणि घरातील येण्या-जाण्याची माहिती असल्याचा फायदा घेत समरने महिनाभरापूर्वी चुलत्याच्या घरातील तिजोरीतून १५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे १४ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने हे सोने सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील देववाडी येथील सोनार संग्राम बाबासो मोरे याला १० लाख रुपयांना विकल्याचे तपासात समोर आले.

सोन्याच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून समरने दसऱ्याच्या मुहूर्तावर नवी महिंद्रा थार गाडी खरेदी केली. गाडी घरी आल्यानंतर त्याने पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी त्याने चुलते उमेश चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोलावले. घरातील सोने चोरीला गेल्याची कल्पना नसल्याने चुलत्यानेही आनंदाने पुतण्याच्या नव्या गाडीचे पूजन केले. मात्र, काही वेळानंतर या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले.

उमेश चव्हाण यांच्या पत्नीने दागिने वापरण्यासाठी तिजोरी उघडली असता सोन्याचे दागिने ठेवलेला डबा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिजोरीतील आजीचे जुने दागिने सुरक्षित होते, मात्र उमेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नीचे १५ तोळे सोने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घरातील तिजोरीची माहिती असलेल्या व्यक्तीनेच चोरी केली असावी, असा संशय आल्याने चव्हाण कुटुंबीयांनी कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर समर चव्हाण याच्याकडे चौकशी केली. नव्या गाडीसाठी पैसे कुठून आले, (Kolhapur) अशी विचारणा केली असता त्याने शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमधून नफा मिळाल्याचे सांगितले. मात्र, त्याला याबाबत ठोस पुरावे देता आले नाहीत. पोलिसांनी त्याचे बँक खाते तपासले असता सोनार संग्राम मोरे याच्याकडून ३ लाख ४० हजार रुपये जमा झाल्याचे आढळले. या आर्थिक व्यवहारामुळे पोलिसांचा संशय बळावला. पुढील चौकशीत समरने चोरीची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी सोनार संग्राम मोरे यालाही आवश्यक कागदपत्रांची पडताळणी न करता सोने खरेदी केल्याच्या आरोपावरून सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी महिंद्रा थार गाडी, सोने आणि मोटारसायकल असा एकूण ३० लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पन्हाळा न्यायालयाने दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जवळच्या नात्यातील विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असलेल्या या घटनेमुळे पन्हाळा तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा