कोणाला किती टक्के? सब घोडे बारा टक्के…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : होय! मी काम केलेच नाही. पण तरीही मला महापालिकेने 85 लाख रुपये दिले. अशी जाहीरपणे कबुली देणाऱ्या श्रीप्रसाद वराळे या ठेकेदाराने “आपला एकट्याचाच बळी जाणार, पैसे खाणारे बाजूला राहणार” हे लक्षात आल्यावर यु टर्न घेतला आहे. टेंडर मधील अटी आणि शर्ती प्रमाणे मी ड्रेनेज पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे आणि त्या कामाच्या देयक मंजुरीसाठी मी ज्याच्या त्याच्या लायकीप्रमाणे (“पदाप्रमाणे) कुणाला किती आणि कधी पैसे दिले याची टक्केवारी जाहीर केली आहे. आता या गंभीर प्रकरणाची तक्रार महापालिका आयुक्तांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली तर अनेक धक्कादायक बाबी समोर येतील. आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी कडकलक्ष्मीचे रूप धारण केले पाहिजे.

महापालिकेच्या एखाद्या ठेकेदाराकडून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे टक्केवारीप्रमाणे वस्त्रहरण केले आहे आणि हे कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत आहे. पन्नास वर्षांपूर्वी जेष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी राजकारणावर केलेल्या कवितेतील दोन ओळी महापालिकेतील भ्रष्टाचाराला तंतोतंत लागू होतात.”त्याच त्याच खड्ड्यामध्ये तोच तोच पुन्हा पाय, जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के” कसबा बावडा परिसरात ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांना मिळाले होते. पण हे काम पूर्ण होण्याच्या आधीच ठेकेदाराला महापालिकेकडून 85 लाख रुपये दिले गेल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाच्या शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.

त्यानंतर हे प्रकरण चांगलेच गाजू लागले होते. अगदी सुरुवातीला श्री वराळे यांनी या प्रकरणात ही सर्व चूक आपलीच आहे, त्यामध्ये कोणताही अधिकारी दोषी नाही अशी कबुली दिली होती. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू होतात श्रीप्रसाद वराळे यांनी यू टर्न घेतला आहे आणि ड्रेनेज पाईपलाईनचे काम मी पूर्ण केले आहे. आणि त्याची देयके मिळण्यासाठी मी शहर अभियंता नेत्रदीप समनोबत, शहर उप अभियंता रमेश कांबळे, जलपुरवठा विभागाच्या प्रज्ञा गायकवाड व इतर अधिकारी, क्लार्क यांना यांना देयक मंजुरीसाठी प्रत्येकाच्या पदाप्रमाणे किती टक्के पैसे दिले आणि रोख स्वरूपात दिले याची नावासह यादीच जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे.

या संबंधित अधिकाऱ्यांनी मंजूर फायलीवर असलेल्या सह्या आमच्या नाहीत अशी भूमिका घेतली आहे. आणि ठेकेदार वराळे यांनी कुणाला किती कधी रोख पैसे दिले आणि मंजूर फायलीवर त्यांच्याच सह्या आहेत असे सांगितल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच गंभीर वळण लागलेले आहे.

महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी संबंधितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीचे चौकशीचे अहवाल आल्यानंतर यासंदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.

याचवेळी हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही चौकशीसाठी जाईल किंवा या विभागाचे अधिकारी स्वतः पुढे होऊन
चौकशी प्रक्रिया चालू करतील. ज्या अधिकाऱ्यांनी देयक मंजुरीच्या फायलीवर असलेल्या सह्या आमच्या नाहीत असा खुलासा केला आहे त्या अधिकाऱ्यांच्या सह्यांचे नमुने तपास यंत्रणे कडून घेतले जातील.

महापालिकेचे ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी त्यांच्यावर न केलेल्या कामाचे देयक घेतल्याबद्दलचा होत असलेला आरोप फेटाळून लावला आहे. मला मिळालेले काम मी पूर्ण केले आहे आणि त्याबद्दल महापालिकेकडून मला पैसे मिळालेले आहेत. आणि हे पैसे मिळवताना मला अधिकाऱ्यांना ठरलेल्या टक्केवारीप्रमाणे रोग पैसे द्यावे लागलेले आहेत असा खळबळ जनक खुलासा केला असल्यामुळे आणि माझा हर्षल पाटील करू नका अशी विनंती केल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतलेले आहे.

हेही वाचा :

ड्रायफ्रुट्स खराब होण्याची चिंता सतावते? अशा पद्धतीने साठवा, वर्षभर राहील फ्रेश

ALT Balaji ने किती कमावते एकता कपूर?, सरकारने दिला झटका; किती कोटींचा फटका

एकनाथ खडसेंवर अनैतिक संबंधांचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ