इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध सामाजिक, आरोग्यविषयक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आयुक्त तथा प्रशासक मा. पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांना शहरवासीयांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आता या महोत्सवातील केवळ काही निवडक अंतिम कार्यक्रम उरले असून, त्यातील मुख्य आकर्षण ठरणार आहे २९ जून रोजी आयोजित हास्यरसाची मेजवानी.
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त दिव्यांग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिर, सर्वसामान्यांसाठी मधुमेह व रक्तदाब तपासणी, तसेच संगीत, नृत्य, जुगलबंदी यांसारखे बहुविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये यशस्वीपणे पार पडले आहेत.

वर्धापन दिनाचे अंतिम टप्प्यातील विशेष कार्यक्रम म्हणून २९ जून रोजी सकाळी महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे टीव्हीवरील लोकप्रिय ‘हस्यजत्रा’ कार्यक्रमाचे थेट सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात अरुण कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, आकांक्षा कदम, माया शिंदे, सपना हेमन, अक्षता सावंत, धनश्री दळवी, सुनील जाधव हे कलाकार आपल्या विनोदी सादरीकरणातून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.
महानगरपालिकेच्या वतीने इचलकरंजीकरांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी या अंतिम कार्यक्रमांनाही मोठ्या संख्येने उपस्थित राहून वर्धापन दिन महोत्सवाची सांगता आनंददायी स्वरूपात अनुभवावी. आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली असून, यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपस्थित होत्या.
