कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मुंबईची लोकल ट्रेन(Local train) सेवा ही जीवन रेषा समजली जाते. तीच सेवा सोमवारी काही प्रवाशांसाठी मृत्यू रेषा ठरली. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात एका वळणावर दोन लोकल ट्रेन अगदी घासून गेल्याने फुटबोर्डवर उभा असलेले, लटकत असलेले प्रवासी एकमेकांना धडकले आणि ते रेल्वे पटरीवर पडले. त्यात चौघा जणांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले. कुणाचे पाय तर कुणाचे हात तुटले. या अपघाताची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी होईल पण धोकादायक वळणावर अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठीची कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे.
मुंब्रा रेल्वे(Local train) स्थानक परिसरात एक धोकादायक वळण आहे. या वळणावरून परस्पर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन च्या दरम्यान फारच कमी अंतर राहते. लोकलला गर्दी असेल तर अनेक प्रवासी दरवाजा बाहेर असलेल्या फुटबोर्डवर उभे असतात किंवा चक्क लोंबकळत असतात. हे प्रवासी या वळणावर एकमेकाला घासतात. त्यामुळे भविष्यात किंवा केव्हाही भीषण अपघात होऊ शकतो. तेव्हा योग्य ती उपाययोजना करण्यात यावी असे एक निवेदन तीन महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला ज्यांने दिले होते त्याच प्रवाशाचे सोमवारच्या मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या अपघातात दोन पाय निकामी झाले आहेत.
सोमवारी घडलेल्या या दुर्घटनेने मुंबई आणि आसपासच्या परिसरात खळबळ उडणे स्वाभाविक आहे. या भीषण अपघाताची रेल्वे प्रशासनाबरोबरच राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आपला नियोजित सोलापूर दौरा रद्द केला. त्यांनी घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले. घडलेल्या घटनेबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. याशिवाय मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदतही जाहीर केली. आता या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाकडून रीतसर चौकशी केली जाईल. अपघाताची कारणे शोधली जातील. लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर उभा राहणाऱ्या प्रवाशांना त्यासाठी जबाबदार धरले जाईल. लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहून किंवा फुटबोर्डवर लटकत प्रवास करण्याची हौस प्रवाशांना नसते.
लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे नाइलाजाने प्रवाशांना धोकादायक स्थितीत प्रवास करावा लागतो. अशा प्रकारची गर्दी टाळण्यासाठी ज्यादा लोकल ट्रेनची व्यवस्था करणे किंवा सर्व प्रकारच्या लोकल्स निर्धारित वेळेत धावतील अशी व्यवस्था करणे महत्त्वाचे आहे. तसे झाले तर अपघात होणार नाहीत. पण त्याचबरोबर परस्पर विरुद्ध दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन धोकादायक वळणावरून जात असतील तर ही वळणे दूर करणे किंवा या वळणावरून एकाच वेळी परस्पर विरुद्ध दिशेने लोकल ट्रेन येणार नाहीत याची दक्षता किंवा नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
मुंबई शहर हे मुंबईची(Local train) जीवनरेषा असलेल्या लोकल ट्रेन वर चालते असे म्हटले जाते. लोकल ट्रेन ही स्थानकावर एक मिनिट किंवा अर्धा मिनिट थांबते. तेव्हा एकाच वेळी ट्रेन मधून स्थानकावर उतरणारे आणि त्याच वेळी लोकलमध्ये प्रवेश मिळवणारे प्रवासी असतात. लोकल मधून उतरणे किंवा चढणे हे कौशल्य केवळ मुंबईकरांना जमू शकते. लोकल ट्रेन उशिरा येणे, किंवा तिची संथ गती असणे ही दोन कारणे लोकल ट्रेनमध्ये गर्दी होण्यासाठी कारणभूत ठरतात. प्रवाशांना त्यांच्या निर्धारित वेळेत इप्सित ठिकाणी पोहोचायचे असते.
नोकरदारांना आपल्या कार्यालयात वेळेत पोहोचावयाचे असते. आणि त्यासाठी लोकल ट्रेन हा एकमेव प्रभावी पर्याय आहे. लोकल ट्रेनच्या तुलनेत मुंबई शहरातील उपलब्ध परिवहन सक्षम नाही. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. अशा प्रकारची घटना भविष्यात घडू नये म्हणून लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवले जातील असे रेल्वे प्रशासनाच्या जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे. हा उपाय म्हणजे रोगापेक्षा भयंकर इलाज अशा प्रकारची ठरू शकते.
मुंबईच्या प्रत्येक लोकलमध्ये(Local train) प्रचंड गर्दी असते. लोकल ट्रेन ही प्रत्येक स्थानकावर 30 ते 60 सेकंद इतकाच वेळ थांबते. इतक्या कमी वेळात प्रवाशांची चढ आणि उतार होणे कठीण असते. अशा वेळीच जर लोकलला स्वयंचलित दरवाजे लावले तर चेंगराचेंगरी होऊ शकते किंवा प्रवाशांचा श्वासही टांगणीला लागू शकतो. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील लोकल ट्रेन प्रवास हा प्रवाशांसाठी सुरक्षित असणे अतिशय महत्त्वाचे आहे. या परिसरातील सामान्य प्रवाशांची वेदना कोणीतरी एका अनामिक कवीने अतिशय योग्य आणि उचित शब्दात मांडली आहे.”रोजी कि फिक्र, रोजी का गम, हादसो का डर! जीना अगर यही है तो, मरना किसे कहे?”
हेही वाचा :