शिराळा तालुक्यातील सोनवडे गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गावातील सचिन नथुराम पाटील यांच्या घरामागील शेडमध्ये शिरून पिलांसह १५ हून अधिक कोंबड्यांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोनवडे आणि परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वेळा शेतमळे, वस्त्या आणि घरांच्या परिसरात (Sonwade) त्याच्या हालचाली दिसून आल्या आहेत. सचिन पाटील यांच्या घराजवळ यापूर्वीही बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले होते. रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर शेडच्या भिंतीवर नखांचे ठसे स्पष्ट दिसून आले असून परिसरात बिबट्याच्या हालचालींचे पुरावेही सापडले आहेत.काही दिवसांपूर्वी गावातील दीपक बाबर यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाला होता. (Sonwade) त्यानंतर आता कोंबड्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे पाळीव प्राणी आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. सायंकाळनंतर बाहेर पडताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुले आणि वृद्धांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी गावाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावून किंवा अन्य उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, (Sonwade) अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे सोनवडे परिसरातील नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून वन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?