कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
सिंहासन, सरकारनामा या राजकीय कथानक असलेल्या दोन मराठी चित्रपटांची तसेच राजनीती या हिंदी चित्रपटाची असे राजकीय वातावरण सध्या महाराष्ट्रात तयार झाले आहे. बुद्धिबळातील खेळाप्रमाणे शह आणि काटसह देण्याचे प्रयत्न इथे सुरू आहेत. राजाला ( सत्ता) सुरक्षित ठेवून वजीराला गारद करण्याचे किंवा त्याला दबावात ठेवण्याचे राजकारण एका ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून सुरू आहे. दोन अडीच वर्षांपूर्वीची ही अर्ध्या पाऊण तासाची क्लिप मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर काढली आहे किंवा काढायला लावली आहे.

राजकारणात एखाद्याचे उपद्रव मूल्य वाढू लागले किंवा आता त्याच्या उपद्रव मूल्याचा फारसा उपयोग नाही असे स्पष्ट होऊ लागले की संबंधिताला त्याची जागा दाखवून देण्यासाठी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या जातात. किरीट सोमय्या यांना त्यांचा वापर करून झाल्यावर त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. (political) त्यामुळे ते बॅक फुटवर फेकले गेले. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान भाई ठाकूर यांच्या विधानसभा मतदारसंघात एका हॉटेलमध्ये पैसे वाटप केले जात असताना विनोद तावडे यांना लाईव्ह दाखवण्यात आले. सध्या भाई ठाकूर कोणासोबत आहेत हे सर्वांना माहीत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी अगदी अचानकपणे “माझे नाव घेऊन एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीतून पाचशे कोटी रुपये आणले.” असा गंभीर आरोप दसरा मेळाव्यात बोलताना केला आणि पाठोपाठ त्यांनी दोन अडीच वर्षांपूर्वीची ऑडिओ क्लिप व्हायरल करून सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या पायात साप सोडला. आता हा साप विषारी आहे किंवा नाही हे नजीकच्या काही दिवसात स्पष्ट होईल पण सध्या तरी पायातील या सापाने शिंदे गटात हवालदिल किती निर्माण केली आहे.
ही संपूर्ण क्लिप अर्धा ते पाऊण तासाची आहे. आणि त्यामध्ये अतुल भातखळकर, सुधीर कुलकर्णी, भाजपच्या आयटी सेल प्रमुख श्वेता शालिनी यांचे संभाषण आहे. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधवण्यासाठी काय करता येईल? त्यासाठी कुणाकुणाचा आधार घ्यावा लागेल. जरांगे पाटलांच्या भाषणातून भाजप हा मराठा समाज द्रोही आहे असा एक संदेश पोहोचतो आहे. त्यावर काय करता येईल? वृत्तपत्रांमध्ये तसेच सोशल मीडियावर आपणाला हवे ते प्रसिद्ध कसे करता येईल? शिवाय श्रीकांत शिंदे मार्फत मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी पाचशे कोटी रुपये दिले गेले आहेत. अशा आशयाचे संभाषण या ऑडिओ क्लिप मध्ये आहेत. संभाषणात भाग घेतलेल्या पैकी भाजपाच्या आयटी सेल प्रमुख श्वेता शालिनी वगळता इतर कोणी या क्लिप बाबत खुलासा केलेला नाही.
श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये पोचवले गेले आहेत असा ओघा ओघाने उल्लेख केला गेला आहे. त्यांना कशासाठी हे पैसे दिले? त्यासाठी श्रीकांत शिंदे यांचीच निवड का केली? हे पाचशे कोटी रुपये भाजपने कुठून उपलब्ध केले याचा उल्लेख या क्लिपमध्ये नाही. जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये दिल्यामुळे त्याचा निवडणुकीत किती फायदा होईल किंवा फायदा होणार नाही याबद्दलचे माझे मत वेगळे आहे असे श्वेता शालिनी यांनी म्हटले आहे.दोन अडीच वर्षांपूर्वीची ही क्लिप मनोज जरांगे पाटील यांनी आत्ताच का व्हायरल केली? त्यामुळे त्यांना (political) त्यांच्या मराठा समाजासाठी या क्लिपचा किती उपयोग होणार आहे? असे प्रश्न उपस्थित होतात आणि तसे ते केले गेले आहेत. विधान परिषदेच्या जागावाटपावरून एकनाथ शिंदे हे नाराज होते. एका ठिकाणी भाजप विरोधात त्यांनी आपला उमेदवार ठेवला आहे. किंवा गेल्या काही महिन्यांपासून महायुती अंतर्गत सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण, याचा संबंध या क्लिपशी असू शकतो. कारण क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि व्हायरल झालेल्या क्लिपची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याचा अर्थ ही क्लिप एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्यासाठी व्हायरल केलेली आहे हे स्पष्ट होते.
एकूणच या क्लिपमधील संभाषण ऐकल्यानंतर राजकारण हे कोणत्या पातळीवर घडत असते याचे आकलन होते. राजकारणापासून काहीशी अलिप्त (political) असलेली मंडळी पक्ष संघटनेसाठी आणि सत्ताकारणासाठी काय काय करत असतात हे या क्लिप च्या माध्यमातून समजून येते. राजाला हतबल करण्याचे, वजीराला खिंडीत गाठण्याचे, त्यासाठी कोणती प्यादी कोणत्या ठिकाणी हलवायची हे बुद्धिबळ खेळात समजते. असाच बुद्धिबळाचा खेळ महाराष्ट्रात महायुती अंतर्गत सध्या सुरू आहे असे म्हणता येते.
हेही वाचा :
अखेर पाऊस आला, राज्यात ऑक्टोबरच्या या तारखेला कोसळधारा, IMD चा महत्त्वाचा अंदाज आला