अँटी करप्शन च्या रडारवर महापालिकेचे अधिकारी…?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेचा वादग्रस्त ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांने ज्यांच्यावर लाच म्हणून भरपूर पैसे घेतल्याचा आरोप केला आहे ते अधिकारी व कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या(anti-corruption) रडारवर आले आहेत. महापालिकेच्या आयुक्त श्रीमती के मंजू लक्ष्मी यांनी तिघांना निलंबित केल्याने ठेकेदार वराळे यांने केलेल्या लाचखोरीच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे.

जलपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड,प.व.डी.चे अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी, वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे
या तिघांना नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे तर मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, वरिष्ठ लेखा परीक्षक सुनील चव्हाण यांची शासनातर्फे विभागीय चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे यांच्याही कारभाराची स्वतंत्र यंत्रणेच्या वतीने चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे वादग्रस्त ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांने या सर्वांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे लिखित पुराव्यासह आरोप केले होते.

ठेकेदार वराळे याला ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम देण्यात आले होते आणि त्याच्यावर देखरेख करण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्यावर होती. वराळे यांने प्रज्ञा गायकवाड यांना आपण एक लाख साठ हजार रुपये
लाच म्हणून दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याबद्दलचे पुरावे म्हणून स्क्रीन शॉट दिले होते. विशेष म्हणजे वराळे याने ज्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते त्या प्रज्ञा गायकवाड यांनीच त्याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीच कसा फिर्यादी होऊ शकतो अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू होती.

एका ठेकेदाराकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे जाहीर आरोप होत असताना महापालिका आयुक्त श्रीमती के मंजू लक्ष्मी यांनी कठोर भूमिका घेतली नाही म्हणून त्यांच्याबद्दल सर्वत्र तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात होती. लोकभावना लक्षात आल्यानंतर त्यांनी कठोर कारवाईचा बडगा उगारलेला दिसतो.

कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्या कार्यालयीन कपाटात असलेली काही कागदपत्रे ठेकेदार वराळे यांने चोरून नेली आहेत. असा दावा गायकवाड यांनीच केला आहे. तर मग यापूर्वीच त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याप्रकरणी ठेकेदार वराळे याच्याविरुद्ध फिर्याद का दाखल केली नाही? स्वतः अडचणीत आल्यानंतर त्यांनी कागदपत्रात चोरीस गेल्याची केलेली तक्रार हे त्यांना उशिरा सुचलेले शहाणपण आहे असे म्हणावे लागेल.

वादग्रस्त ठेकेदार श्रीप्रसाद वराळे याने कोल्हापूर महापालिकेचे निवृत्त अभियंते आणि विद्यमान अभियंता व इतर अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप जाहीरपणे केले आहेत आणि त्यांनी आपण या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही(anti-corruption) रीतसर तक्रार करणार आहोत असे सांगितले आहे.

तथापि अशा प्रकारचे शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर जेव्हा आरोप होत असतात तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागा कडूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते. अगदी सुरुवातीला संबंधितांची गोपनीय चौकशी केली जाते, त्यानंतर उघड चौकशी केली जाते, आणि मग सकृत दर्शनी पुरावे दिसून आले की गुन्हा दाखल केला जातो. सध्या लातूर प्रतिबंधक विभागाच्या रडारवर महापालिकेचे हे निवृत्त व विद्यमान अधिकारी कर्मचारी आलेले आहेत. त्यांची चौकशी प्राथमिक पातळीवर सुरू आहे.

माहितीच्या अधिकाराचा वापर करून काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणीत आणणारे, मीडियाला माहिती देणारे सराईत कार्यकर्ते सध्या गाजत असलेल्या या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.उबाठा सेना आणि आम आदमी पार्टी यांच्यावतीने या प्रकरणावर जोरदार आवाज उठवण्यात आला होता.

हेही वाचा :

गौतम गंभीरचा इंग्लंडच्या ग्राऊंडमॅनवर चढला रागाचा पारा, सर्वांसमोर धमकी, Video Viral

निवडणूक आयोगाची तयारी सुरु, ‘या’ महिन्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी

थार चालकाच अमानवी कृत्य! वृद्ध व्यक्तीच्या अंगावर गाडी घातली अन्…; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप