दोन्ही पवार एकत्र येणार? सुप्रिया सुळे निर्णय घेणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : न्यायालयीन अडथळा दूर झाल्यानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात त्याबद्दलची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून चारी केली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय(political) पक्षांनी प्राथमिक पातळीवरील हालचाली सुरू केले आहेत. त्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची भाषा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील याचे संकेत दिले आहेत. तसेच झाले तर महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, कारण या आघाडीचे संस्थापक अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांच्या मांडवाखाली येणार आहेत.

शरद पवार यांचं राजकारण(political) अगदी नेमकेपणाने कुणालाही समजून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर आम्ही पुन्हा जनतेमध्ये जाऊ. पक्ष पुन्हा नव्याने उभा करू. पक्ष फुटीच्या संकटातून मी पूर्वी एकदा गेलो आहे. मला सोडून गेलेल्यांना सर्वसामान्य जनता जवळ करत नाही, त्यांना माफ करत नाही असे सांगत राज्यभर फिरणाऱ्या शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत चांगले यशही मिळालं पण विधानसभा निवडणुकीत त्यांची तुतारी फारशी वाजली त्यांना सोडून गेलेल्या मंडळींना सर्वसामान्य जनतेने चांगली साथ दिली.

शरद पवार यांना लोकांनी नाकारले. आपल्या गटाची पडझड होत असल्याचे वास्तव आता त्यांनी स्वीकारलेले दिसते. काही दिवसांपूर्वी त्यांना माध्यम प्रतिनिधींनी”तुम्ही आणि अजित दादा काही निमित्ताने वारंवार एकत्र येत असल्याचे दिसता. तेव्हा दोन्ही गट एकत्र येणार आहेत काय?”असे विचारले असता त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सोबत जायचे किंवा नाही याचा निर्णय सुप्रिया घेईल असे उत्तर देऊन सर्वांनाच चकित करून सोडले आहे.

राष्ट्रवादीचे(political) दोन्ही गट एकत्र येणार अशी चर्चा अजून मधून सुरू होत असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दोन्ही गटाचे विलीनीकरण किंवा दोन्ही गटांनी एकत्र येणे याबद्दलचा निर्णय संघटनात्मक पातळीवर घेतला जाणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवार यांनी त्यांच्या गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोपवणे आवश्यक होते.

मात्र त्यांनी सुप्रिया सुळे याच काय तो निर्णय घेतील असे स्पष्ट करून आपली राजकीय वारसदार सुप्रियाच असेल असे त्यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे यांना याबद्दल विचारले असता त्यांनी आपण यासंदर्भात कार्यकर्त्यांशी बोलू, त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल असे सांगितले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात शरद पवार निर्णय घेतात आणि मग कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असल्याचे सांगतात.

शरद पवार आणि अजितदादा हे दोघेही काही संस्थांच्या माध्यमातून व्यासपीठावर एकत्र येतात हे या महाराष्ट्राने यापूर्वी अनेकदा पाहिले आहे. गेल्या महिन्याभरात हे काका पुतणे अनेकदा एकत्र दिसले आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्या समवेत एका कार्यक्रमात दिसले होते. हे उबाठा गटाच्या संजय राऊत यांना आवडलेले दिसत नाही. आम्ही तरी अशा गद्दारांच्या सोबत एकत्र व्यासपीठावर आलो नसतो. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. मी कोणत्या कार्यक्रमाला जायचे किंवा कोणत्या कार्यक्रमाला जायचे नाही, कुणाचा सत्कार करायचा आणि कुणाचा सत्कार करायचा नाही हे आता मी संजय राऊत यांना विचारून ठरवायचे काय? असा पलटवार शरद पवार यांनी केला होता.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर संजय राऊत हे शरद पवार गटाचे प्रवक्ते असल्यासारखे माध्यमाच्या समोर व्यक्त व्हायचे. तेव्हा अजितदादा यांनी त्यांना चांगलेच फटकारले होते. तुम्ही शिवसेनेचे प्रवक्ते आहात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही. इतक्या स्पष्ट शब्दात सांगूनही शरद पवार हे माझे दैवत आहे असे संजय राऊत सांगत होते . आता तेच शरद पवार यांना सल्ले देऊ लागले आहेत.

शरद पवार आणि अजित दादा(political) हे दोघे पुन्हा एकत्र आले तर महाविकास आघाडीचे काय होणार? हा प्रश्न संजय राऊत यांना सतावत असल्याचे दिसते आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शरद पवार यांचे सोबत नसले तर त्यांच्याशिवाय आम्ही मुंबई महापालिका जिंकवून दाखवू असेही संजय राऊत हे मोठ्या आवाजात सांगू लागले आहेत. शरद पवार गटात काहीसे नाराज असलेले आमदार रोहित पवार यांनीही सुप्रिया सुळे एकत्रिकरणाच्या संदर्भात निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया देऊन शरद पवार यांच्या मनात एकत्रीकरणाचा विचार असल्याचे सुचित केले आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी महावितरण अधिकाऱ्याला लाच घेताना ACB ने धरले

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदांची घोषणा

“आता थांबायचं नाही” चित्रपटाचे इचलकरंजीतील सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आयोजन