संसदेच्या अधिवेशनात चर्चा “ऑपरेशन सिंदूर”ची

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती जगदिप धनकड यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा आणि इतर विषयांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील पहिला आठवडा चांगलाच गाजला. याच अधिवेशनात ऑपरेशन सिंदूर वर सोळा तासांची चर्चा केली जाईल असे संसदीय कार्यमंत्र्यांनी जाहीर केले होते आणि संसदेच्या दुसऱ्या आठवड्यात सोमवारी चर्चेला प्रारंभ झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 22 एप्रिल रोजी पहेलगाम येथे पाक स्थित अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर केलेला हल्ला, त्यामध्ये 26 पर्यटकांचा झालेला मृत्यू, त्यानंतर पंधरा दिवसांनी केलेले ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) यावर सभागृहाला विस्तृतपणे माहिती दिली.

एकीकडे संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) विषयी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे काश्मीरमध्ये “ऑपरेशन महादेव”च्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी तीन अतिरेक्यांचा खात्मा केला आणि त्यामध्ये पहेलगाम दहशतकांडातील दोन अतिरेक्यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती संपूर्ण देशाला मिळाली हा एक विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.

ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तान मधील दहशतवाद्यांच्या नऊ तळावर हल्ले करून शंभर पेक्षा अधिक अतिरेक्यांना कंठस्नान घातले, पाकिस्तानची मर्यादित युद्ध झाले, पण पहेलगाम दहशतगंडातील एकही दहशतवादी सापडला नसल्याबद्दल इंडिया आघाडी कडून सत्ताधारी एनडीए आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला जात होता.

संसदेच्या सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर बोलताना काँग्रेसचे खासदार गौरव गोगई यांनी हाच मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याचवेळी काश्मीरमध्ये पहेलगाम दहशतकांडामधील दोन दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार मारल्याचे वृत्त मीडियावर झळकत होते. काश्मीरमध्ये जे तीन दहशतवादी मारले गेले त्यामध्ये पहेलगामचे दोन दहशतवादी आहेत यावर अजून अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेले नसले तरी, मीडियाने सूत्राचा आधार घेऊन त्याबद्दलची माहिती दिलेली आहे.

ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) आणि त्यानंतर पाकिस्तानशी झालेले मर्यादित अघोषित युद्ध याबद्दलची सविस्तर माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली आणि या एकूण लष्करी कारवाईत भारताचा एकही जवान शहीद झाला नाही हे ठामपणे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेच्या निकालाबद्दल बोला, परीक्षा देताना पेन तुटलं की पेन्सिल तुटली हे कशाला विचारता असा सवाल राजनाथ सिंह यांनी चर्चेच्या दरम्यान केला आहे आणि तो काहीसा सावधपणे केलेला दिसतो. नुकसान किती झाले हे कशाला विचारता? मर्यादित युद्ध आम्ही जिंकले आहे हे सत्य स्वीकारा असे त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन केले आहे.

ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याच एका विषयावर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली होती. ही मागणी करताना शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटतील अशी काही विधाने केली गेली होती. ऑपरेशन सिंदूर आणि अघोषित छोट्या युद्धात भारताची काही लढाऊ विमाने पाकिस्तानाने पाडली आहेत, शस्त्रसंधी अचानक कशी काय जाहीर केली? त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव होता काय? पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याची संधी मिळालेली असताना शस्त्रसंधी मान्य करून ती का गमावली? असे काही प्रश्न या निमित्ताने विरोधकांनी उपस्थित केले होते.

विरोधकांच्याकडून हे मुद्दे या चर्चेच्या वेळी मांडले जाणार आहेत, आणि त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ आणि अनुभवी सदस्यांना चर्चेच्या मैदानात उतरवण्याचे निश्चित केलेले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताला पाकिस्तानशी युद्ध खेळायचे नव्हते आणि नाही. दहशतवादी अड्डे नष्ट करणे हे एकमेव उद्दिष्ट होते आणि ते शंभर टक्के यशस्वी झाले आहे. भारत हा युद्धापेक्षा बुद्ध तत्त्वज्ञानाला महत्त्व देतो.

आम्ही कुणाच्याही दबावाखाली शस्त्र संधी स्वीकारली नाही. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांकडून विनंती आली आणि मग ती आमचे उद्दिष्ट पूर्ण झालेले असल्यामुळे मान्य केली असे राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातील खुलासा करताना सांगितले. मात्र काँग्रेसचे गोगई यांनी मात्र पाक व्याप्त काश्मीर घेण्याची संधी चालून आलेली असताना आणि पाकिस्तानचे थोबडे रंगवण्याची वेळ आली असताना अचानक शस्त्र संधी करून तमाम भारतीयांच्या भावना या सरकारने दुखावलेले आहेत. अचानक केलेल्या शास्त्र संधीने तमाम भारतीयांना तेव्हा आश्चर्य वाटले होते. असा घनाघात गोगई यांनी सरकारवर केला आहे.

ऑपरेशन सिंदूर बद्दल सुरू झालेल्या चर्चेचा समारोप कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ऑपरेशन सिंदूर मुळे निश्चित केलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झालेले आहे असे सरकार म्हणत आहे मग त्याचवेळी ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही असे का सांगितले जात आहे? ऑपरेशन सिंदूर चा धडा पाकिस्तानी घेतलेला असून पुन्हा ते भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्याचे धाडस करणार नाही असे आत्मविश्वासाने सरकारकडून सांगितले जात असेल तर मग ऑपरेशन सिंदूर स्थगित आहे ते संपलेले नाही असे का सांगितले जात आहे? या प्रश्नाचे उत्तर संसदेच्या सभागृहात सुरू असलेल्या चर्चेतून मिळेल अशी अपेक्षा करूया!

हेही वाचा :

रक्षाबंधनाआधीच बहिणीचा अक्राळविक्राळ चेहरा, भावाचा गळा दाबून…

महाराष्ट्र मंत्रिमंडळात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्रीची शक्यता! शिंदेंकडून ‘मास्टरस्ट्रोक’, अजित पवार गटाला धक्का?

जैन समाजाचे एकत्रित आवाहन – JIO चा बहिष्कार करून माधुरीसाठी न्याय मागा