अन्न व औषध प्रशासनाने बीड जिल्ह्यात केलेल्या धडक कारवाईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खवा आणि पनीर अधिक पांढरे व आकर्षक दिसावे यासाठी औद्योगिक वापरातील घातक सॅफोलाइट रसायनाचा वापर होत असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणानंतर राज्यभरात अन्नसुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

खवा आणि पनीरमध्ये घातक रसायनाची भेसळ अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शिरूर तालुक्यातील दहीवंडी येथील जय श्री कृष्णा केक अँड बर्फी या उत्पादन केंद्रावर छापा टाकला. तपासणीदरम्यान खवा, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ अधिक चमकदार दिसावेत म्हणून सॅफोलाइट या धोकादायक रसायनाची भेसळ केल्याचे निदर्शनास आले. (Food and Drug) यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मिठाईसह इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.
कारवाईदरम्यान सुमारे 35 हजार 536 रुपयांचा मिल्क केक, बर्फी, कच्चा माल आणि इतर खाद्यपदार्थ असुरक्षित, कमी दर्जाचे आणि भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आले. हे पदार्थ अस्वच्छ परिस्थितीत साठवण्यात आले होते आणि ते नाशवंत असल्याने घटनास्थळीच खोल खड्ड्यात टाकून नष्ट करण्यात आले. (Food and Drug) याशिवाय संबंधित व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा कायदा तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॅफोलाइट आरोग्यासाठी अत्यंत घातक सॅफोलाइट, ज्याला रासायनिक भाषेत सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट किंवा रॉन्गालाइट असेही म्हटले जाते, हे औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात आलेले रासायनिक द्रव्य आहे. या रसायनाचा वापर मुख्यतः कापड उद्योगात कपड्यांना रंग देणे, छपाई करणे तसेच अतिरिक्त रंग काढून टाकण्यासाठी केला जातो. अन्नपदार्थांच्या निर्मितीसाठी या रसायनाचा कोणताही वैध वापर नाही. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सॅफोलाइट हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आणि विषारी रसायन मानले जाते. अशा रसायनाची खवा, पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. (Food and Drug) त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने अशा प्रकारच्या भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना दर्जा आणि विश्वासार्हतेची खात्री करूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?