इचलकरंजी (प्रतिनिधी): इचलकरंजी महानगरपालिकेकडून सुमारे सव्वा सात कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. मात्र, या उद्घाटन कार्यक्रमा संदर्भात महापालिकेकडून प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली, ज्यामुळे शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्घाटन कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा पत्रकारांना आमंत्रण देण्यात आले नाही, तसेच माजी आमदार, माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पदाधिकारी किंवा माजी नगरसेवक यांनाही कार्यक्रमाची माहिती देण्यात आली नाही.
महत्वाचे म्हणजे, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग असलेले माजी नगरसेवक व स्थानिक रहिवासी देखील या कार्यक्रमाबाबत अनभिज्ञ होते.
गुपचूप पद्धतीने झालेला कार्यक्रम, उपस्थितांचे फोटोही फारशा प्रसिद्ध न करता, तात्काळ उरकण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे महापालिकेच्या पारदर्शकतेवर आणि जनतेशी असलेल्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहराच्या विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना, अशा प्रकारच्या गुप्ततेने आयोजित कार्यक्रमामुळे लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवली जात आहे, अशी प्रतिक्रिया काही माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात महापालिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.
हेही वाचा :