देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

देशातील वाढत्या महागाईचा फटका आता सर्वसामान्य कुटुंबांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला आहे. दूध, डाळी, खाद्यतेल, भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत असल्याने गृहिणींचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. घरखर्च भागवताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याची वेळ आली आहे.

लोकल सर्कल्सने देशभरातील ३२६ जिल्ह्यांमधील १.३४ लाखांहून अधिक ग्राहकांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून महागाईचे गंभीर चित्र समोर आले आहे. देशातील तब्बल ६१ टक्के कुटुंबांचा गेल्या १२ महिन्यांत जीवनावश्यक घरगुती वस्तूंवरील मासिक खर्च २० टक्क्यांहून अधिक वाढल्याचे दिसून आले आहे. (country) म्हणजेच जवळपास दहापैकी सहा कुटुंबांना वाढत्या खर्चाचा सामना करावा लागत आहे.

दुधाच्या दरवाढीनेही सर्वसामान्यांच्या खर्चात भर पडली आहे. अमूल आणि मदर डेअरीने १२ नोव्हेंबर २०२६ पासून दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी दरवाढ आहे. दुसरीकडे, कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी दुधाच्या दरात प्रतिलिटर आठ रुपयांनी वाढ केली आहे. पनीर आणि तुपाच्या किमतीही वाढल्या असून अमूलने तुपाच्या दरात प्रतिकिलो ५० रुपये, तर बटरच्या दरात प्रतिकिलो १५ रुपयांची वाढ केली आहे.

महागाईचा सामना करण्यासाठी नागरिकांनी आपल्या खर्चाच्या पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वेक्षणातील ७४ टक्के लोकांनी अनावश्यक खर्च कमी केल्याचे सांगितले, तर ५० टक्के लोकांनी पूर्वीच्या तुलनेत कमी वस्तू खरेदी करत असल्याचे स्पष्ट केले. (country) त्यामुळे महागाईचा परिणाम केवळ आर्थिक बजेटवरच नव्हे, तर कुटुंबांच्या दैनंदिन गरजांवरही होत असल्याचे दिसून येते.

सर्वेक्षणानुसार, ७५ टक्के ग्राहकांना तूप, लोणी आणि खाद्यतेलाच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ जाणवली आहे. तर ७३ टक्के लोकांनी ताज्या भाज्या महागल्याचे आणि ७१ टक्के लोकांनी तांदूळ, गहू व इतर धान्यांच्या किमती वाढल्याचे सांगितले. घाऊक बाजारातही महागाईचा दबाव कायम असून बँक ऑफ बडोदाचा अत्यावश्यक वस्तू निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ११.१ टक्क्यांनी वाढला आहे.

दरम्यान, वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल ८० टक्के कुटुंबांनी साठेबाजी करणाऱ्यांवर आणि कृत्रिमरीत्या वस्तूंच्या किमती वाढवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. वाढता घरखर्च, कमी होणारी बचत आणि महागाईचे संकट (country) यामुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर आर्थिक आव्हान अधिकच गंभीर बनले आहे.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू