वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना

रस्त्याचे काम सुरू असताना आपत्कालीन वाहनांसाठी मार्ग मोकळा ठेवण्याची जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल अलिबागमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे. कारण दोन वर्षाच्या चिमुकल्याला वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे जीव गमवावा लागला आहे.

खेळताना फुगा गिळल्याने प्रकृती गंभीर झालेल्या अवघ्या एक वर्षे आठ महिन्यांच्या आरांश सुशील ठाकूर या चिमुरड्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, बेलकडे-अलिबाग – वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकेला विलंब झाला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आरांशचा मृत्यू झाला.(Alibagh) मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरांश खेळत असताना त्याने फुगा गिळला. त्यामुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ केली. रुग्णवाहिकेतून त्याला अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मात्र, बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. या कोंडीत रुग्णवाहिकाही अडकली आणि तिला पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला.

दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात पोहोचली. मात्र, तोपर्यंत आरांशचा मृत्यू झाला होता. चिमुरड्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने बामणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.अलिबाग ते मुरुड दरम्यान महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्यावतीने रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कुरुळ ते बेलकडे दरम्यान सुरू असलेल्या या कामामुळे या महामार्गावर सध्या प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. (Alibagh) अशावेळी टप्प्याटप्प्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवून रस्ता वाहतूक सुरळीत ठेवणे आवश्यक आहे. मात्र संबधित यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गावरील रस्तेवाहतूकीचा बोजवारा उडाला असल्याचे सध्या चित्र आहे. वाहतूक पोलीस या ठिकाणी उपस्थित नसल्याने, निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार मिळू न शकल्याने, चिमुरड्या आरांशला जीव गमवावा लागला आहे.

या घटनेमुळे अलिबागमधील रस्त्यांच्या कामांच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विकासकामे नागरिकांच्या सोयीसाठी केली जातात; मात्र काम सुरू असताना रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन वाहनांना तातडीने मार्ग मिळेल, याची व्यवस्था करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. (Alibagh) रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यायी मार्ग, वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे कर्मचारी आणि आपत्कालीन वाहनांना प्राधान्याने मार्ग मोकळा करून देण्याची यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : 

अल्पवयीन मुलींना रात्री रस्त्यावर उतरवणे एसटी कर्मचाऱ्यांना भोवले बस चालक अन् कंडक्टर निलंबित

लाडकी बहीण योजनेचे ₹3,000 एकत्र मिळणार ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

कुरुंदवाड न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू