देवमोरे व दरीबे गल्लीतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर – संतप्त नागरिकांचा रस्त्यावर कचरा टाकून निषेध

इचलकरंजी (प्रतिनिधी) :
इचलकरंजीतील गावभाग परिसरातील देवमोरे गल्ली व दरीबे गल्ली येथील रहिवाशांनी घंटा गाडी वेळेवर न येणे, कचरा न उचलणे आणि सेवा व्यवस्थेतील ढिसाळपणा यामुळे संतप्त होत रस्त्यावर कचरा टाकून निषेध नोंदवला.

नागरिकांनी सांगितले की, घंटा गाडी नियमित येत नाही, आल्यावर फार वेळ थांबत नाही, आणि घराघरातील कचरा उचलण्यात टाळाटाळ केली जाते. परिणामी घरात कचरा साठतो व शेवटी नागरिकांनी पर्याय न राहता तो रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे.



पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या कचऱ्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यधोके वाढत असल्याने स्थानिक नागरिक मोठ्या अडचणीत आहेत.
या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाचे अधिकारी, वॉर्ड निरीक्षक, सफाई कर्मचारी व घंटा गाडी चालकांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावून, या गल्लीतील प्रश्नांवर तत्काळ उपाययोजना करण्यात आली.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रमोद बचाटे व सचिन कोरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व प्रशासनासोबत चर्चा करून तातडीने योग्य त्या सुधारणा करण्याची मागणी केली.

त्यांच्या पुढाकाराने संबंधित अधिकाऱ्यांनी घंटा गाडी नियमित पाठवण्याचे, घराघरातून कचरा उचलण्याचे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले.

नागरिकांनी आता सेवा सुधारण्यासाठी प्रशासनाने दिलेला शब्द पाळावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.