जानेवारीच्या धुक्याने हरवलेली सकाळ, फेब्रुवारीची गुलाबी थंडी, मार्चच्या वाऱ्याची हळुवार झुळूक आणि जूनच्या पहिल्या सरींची खात्री… कोल्हापूरच्या ऋतुचक्राची ही अनेक पिढ्यांच्या स्मरणातली ओळख आहे. शहराला १७५ वर्षांपूर्वीच्या ब्रिटिशकालीन नोंदींमध्ये समशितोष्ण म्हटले गेले. इतकेच नव्हे, तर येथील रात्री नेहमी थंड असतात, (Kolhapur) अशी नोंदही ब्रिटिशकालीन दस्तऐवजांमध्ये स्पष्ट आहे. मात्र, हवामान बदलाचा घाला कोल्हापूरवर बसत आहे. परिणामी, अल्हाददायक कोल्हापूरचे संपूर्ण ऋतुचक्रच बदलत चालले आहे. दिवसागणिक दिवस तापत आहेतच; पण त्याहून अधिक तापल्या आहेत त्या रात्री.

कोल्हापुरात १८४८ ते १८५१ या काळातील हवामान नोंदी आणि भारतीय हवामान विभागाच्या १९९१ ते २०२५ कालावधितील हवामान नोंदींची तुलना केली असता एप्रिल महिन्यातील रात्रीचे सरासरी तापमान जवळपास पाच अंशांनी वाढल्याचे दिसते. मे महिन्यात ही वाढ साडेचार अंशांच्या आसपास आहे. (Kolhapur) विशेष म्हणजे दिवसांच्या तापमानातील वाढ तुलनेने कमी असून, रात्रींचा गारवा अधिक वेगाने कमी झाला आहे. ‘नेहमी थंड असणाऱ्या रात्री’ हरवल्या ब्रिटिशकालीन १८५१ मधील हवामान नोंदींमध्ये कोल्हापूरच्या रात्रींबाबत ‘द नाईटस् आर इनव्हेरिअबल कूल’ असा उल्लेख आढळतो. मात्र, ऐतिहासिक नोंदी आणि सध्याच्या नोंदींची तुलना केली असता, एप्रिल महिन्यातील सरासरी रात्रीचे तापमान तब्बल ४.९ अंशांनी वाढल्याचे दिसते. मे महिन्यात ही वाढ ४.४ अंशांची आहे. दिवसांपेक्षा रात्री अधिक तापल्याचे हे चित्र हवामान बदलाचा परिणाम अधोरेखित करणारे आहे.
यंदा जूनमध्ये उष्ण रात्रींचा नवा विक्रम हवामान विभागाच्या १९६९ पासूनच्या नोंदींनुसार जून महिन्यातील सर्वाधिक किमान तापमानांच्या पहिल्या दहा नोंदींमध्ये यंदाच्या जूनमधील तब्बल सहा रात्रींचा समावेश आहे. ३ जून २०२६ रोजी किमान तापमान २५.७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. (Kolhapur) एकाच वर्षातील सहा रात्रींचा टॉप-१० यादीत समावेश होणे हे कोल्हापूरमधील वाढत्या उष्ण रात्रींचे आणि बदलत्या हवामानाचे महत्त्वपूर्ण संकेत मानले जाऊ शकतात.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?