आग लागली तपासाचा धूर दिसेना?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

समाजाविरुद्धचा गुन्हा आणि व्यक्ती विरुद्ध चा गुन्हा, असे गुन्ह्याचे दोन प्रकार आहेत. ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली किंवा लावलेली आग हा या दोन्ही गुन्ह्यांच्या प्रकारात येत नाही आणि म्हणूनच आग लागली आहे पण तपासाचा धूर काही निघताना दिसत नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

समाजाच्या विरुद्धचे गुन्हे म्हणजे जात संघर्ष, धर्मकलह, अर्थात त्यातून होणाऱ्या दंगली. त्यातून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येते. म्हणून समाजाविरुद्धचे गुन्हे हे अधिक गंभीर स्वरूपाचे समजले जातात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा अगदी जलद गतीने सक्रिय होतात. जातकलह पेटवणाऱ्यांना, दंगल करणाऱ्यांना अटक केली जाते. (Keshavrao Bhosale) त्यांच्यावर खटले दाखल केले जातात. व्यक्ती विरुद्ध चे गुन्हे म्हणजे अ दखलपात्र गुन्ह्यांपासून ते दखलपात्र गुन्ह्यापर्यंतचे सर्व प्रकार होत. या गुन्ह्यात व्यक्तींचे व्यक्तिगत पातळीवरील नुकसान होते, दुखापती होतात, प्रसंगी मरण येते, भरून न येणारे नुकसान केले जाते. त्यामुळे या गुन्ह्यांची दखलही गांभीर्याने घेतली जाते. कारण व्यक्तिगत किंवा व्यक्तीविरुद्धचे गुन्हे रोज घडत असतात.

दिनांक आठ ऑगस्ट 2024 मध्ये मध्यरात्री ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली आणि शंभर सव्वाशे वर्षांपूर्वीची वास्तु स्थापत्य शास्त्रातील सुंदर अविष्कार काही तासात बेचीराख झाला. या घटनेमुळे ना कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली, ना कुणाचे व्यक्तिगत नुकसान झाले. आणि म्हणूनच अतिशय गांभीर्याने या घटनेचा तपास झाला नाही. आग लागली तपासाचा धूर काही लोकांना दिसला नाही असे खेदाने म्हणावे लागेल. राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली या पॅलेस थियेटर ची उभारणी केली. (Keshavrao Bhosale) त्याला अंदाजे 120 वर्षे होऊन गेली. नंतर त्याला कोल्हापूरचे ख्यातनाम गायक संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे नाव देण्यात आले. दोन वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला अचानक आग लागली आणि ती इतक्या जलद गतीने फैलावली की तिथे अग्निशमन यंत्रणेचे सुद्धा काही चालले नाही. बेचिराख होणे म्हणजे काय, हे या आगीकडे पाहिल्यानंतर लोकांना समजले. आगीची कोणतीही घटना असो त्याची दखल संबंधित पोलीस ठाण्याला घ्यावी लागते.

तशी ती जुना राजवाडा पोलीस ठाण्याने घेतली होती. तशी स्टेशन डायरीला नोंदही घेतली गेली आहे. अशा घटनांची नोंद एक अपघात अशीच घेतली जाते. अशा प्रकारच्या घटना दुर्लक्ष केले म्हणून किंवा विद्युत प्रवाह यंत्रणेत काही बिघाड झाल्यामुळे घडतात. पण केशवराव भोसले नाट्यगृह जळीत प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही आग शॉर्टसर्किटने लागलेली नाही असा लिखित स्वरूपात निर्वाळा दिला आहे. पण त्यानंतर महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या व्यवस्थापकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडे, रितसर फिर्याद द्यायला हवी होती. शॉर्टसर्किटने ही आग लागलेली नसल्यामुळे या वास्तूला कोणीतरी अज्ञातांनी मनात काहीतरी हेतू ठेवून मुद्दाम आग लावलेली आहे असे त्यांनी म्हणायला हवे होते. पण प्रत्यक्षात तसे काही घडल्याचे दिसत नाही.

या ऐतिहासिक वास्तूच्या जाळीत प्रकरणाचा तातडीने तपास होऊन अज्ञात गुन्हेगारांना तपासाच्या मंचावर आणले पाहिजे असा आग्रह धरून कोल्हापूरचे लोक किंवा इथले कलाकार तेव्हा रस्त्यावर उतरलेले दिसले नाहीत. परिणामी पोलिसांनी तपासच केला नाही असे म्हणता येईल. या जळिताची रासायनिक चिकित्सा अर्थात फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन करण्यात आले आहे मात्र त्याचा नेमका अहवाल काय म्हणतो किंवा अहवालात काय म्हटले आहे हे लोकांच्या समोर आणले गेले नाही. पेट्रोलजन्य किंवा अति ज्वलनशील पदार्थाने ही आग लागली. आता हे अति ज्वलनशील पदार्थ तिथे कसे आले हा तपासाचा मुख्य भाग होता आणि आहे. (Keshavrao Bhosale) या प्रकरणात पोलीस प्रमुखांनी स्वतंत्र तपास पथकाची स्थापना करणे गरजेचे होते. जुना राजवाडा पोलिसांना या घटनेचा तपास प्रभावीपणे करता येणार नाही. तो शास्त्रीय पद्धतीने तसेच उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने झाला पाहिजे होता. पण तसे झाले नाही. म्हणजेच पोलीस याप्रकरणी उदासीन होते.

आपले व्यक्तिगत नुकसान झाले नाही, सार्वजनिक वास्तूचे झालेले नुकसान शासन किंवा तत्सम यंत्रणांकडून भरून काढले जाईल, पुन्हा वास्तू उभारली जाईल अशी मानसिकता असलेल्या सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला नाही. केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली किंवा लावलेली आज हा समाजाविरुद्धचा गुन्हा नाही तसेच व्यक्तीविरुद्धचाही गुन्हा नाही म्हणून मग सर्वसामान्य लोक आणि पोलीस यांची भूमिका कमालीच्या पातळीवर उदासीन राहिली. आता सुमारे 35 ते 40 कोटी रुपये खर्च करून संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीच्या दिमाखात उभा राहिले आहे. नजीकच्या काही दिवसात त्याचे लोकार्पणही होईल. पण या प्रकरणाचा जुना राजवाडा पोलिसांनी नेमका काय तपास केला या वरचा पडदा उघडला जाणार नाही. अजूनही या प्रकरणाची तपासाची फाईल रि ओपन करता येऊ शकते. तज्ञ अधिकारी आणि अशा प्रकरणाचा तपास करण्याचा अनुभव असलेली टीम नियुक्त करता येईल.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लावल्यामुळे, आणि ते आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे कुणाचा फायदा होणार होता? कुणाच्या भ्रष्टाचाराचा पुरावा नष्ट होणार होता? या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाशी कोण संबंधित होते आणि आहेत? या सर्वांची सखोल चौकशी करण्यात आली तर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. नाट्यगृहाच्या अंतर्गत असलेली विद्युत प्रवाह यंत्रणा बिघडलेली नव्हती, हा महावितरण मधील अभियंत्यांचा अभिप्राय असल्यामुळे ही आग लावण्यात आली हे अधोरेखित होते. आणि म्हणूनच आग लावणाऱ्यांचा छडा लागला पाहिजे. पोलिसांना विंगेत उभे राहून चालणार नाही त्यांनी प्रत्यक्ष मंचावर येऊन तपास काय झाला आणि तो कुठे थांबला, कशासाठी थांबला याचा खुलासा केला पाहिजे.

हेही वाचा :

12 ऑगस्टला येणार नवी Bajaj Pulsar जाणून घ्या काय असेल खास?

शहरात दिवसभर दमदार तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी?

इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा?