केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असून, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वरिष्ठ नेत्यांमध्ये गुप्त बैठकींचे सत्र सुरू असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यानंतर गुरुवारी रात्री जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. (political) याच दिवशी पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सुरू असलेल्या चर्चांबाबत माहिती घेतल्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चांचा इन्कार करत आपण या विषयावर थेट सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) अधिक मजबूत करण्यासाठी भाजप दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळातील वाटा वाढवण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.तथापि, हे विलीनीकरण सोपे नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पक्षातील नेतृत्व, पदांचे वाटप आणि भविष्यातील वर्चस्व यावरून दोन्ही गटांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे. (political) काही वृत्तांनुसार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते आणि आमदार दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावे, या मताचे असल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य विलीनीकरण झाल्यास पक्षातील प्रमुख पदे आणि सरकारमधील प्रतिनिधित्वाबाबत काही अटी मांडल्या जाऊ शकतात. यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वासह राज्यातील सत्तासमीकरणांबाबतही चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.दरम्यान, संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात आहे. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना यांसारख्या महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांसाठी व्यापक राजकीय पाठिंबा मिळवण्यावरही भर दिला जात असल्याची चर्चा आहे.

सार्वजनिकरित्या मात्र दोन्ही गटांचे नेते विलीनीकरणाच्या चर्चांना दुजोरा देण्यास टाळाटाळ करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, राजकारणात परिस्थिती क्षणाक्षणाला बदलत असल्याने भविष्यात कोणते नवे समीकरण तयार होईल, हे सांगता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. (political) गेल्या काही दिवसांतील बैठका, वाढलेल्या राजकीय हालचाली आणि पडद्यामागील चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, विलीनीकरणाबाबत कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसल्याने सर्वांचे लक्ष आगामी राजकीय घडामोडींवर लागले आहे.

हेही वाचा :

शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?

12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?