इचलकरंजी (प्रतिनिधी) :
इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीची पाणीपातळी सतत वाढत असून, वाढलेल्या प्रवाहामुळे शहरातील जुना पूल धोकादायक स्थितीत आला आहे. नदीचे पाणी थेट पुलाला घासत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सायंकाळी ७ वाजता पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सावधगिरीचा उपाय म्हणून पूल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून, नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने मोजली जात आहे. शहरात पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.
नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी नदीच्या प्रवाहावर लक्ष ठेवून सतर्कता बाळगली जात आहे. पूरजन्य परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ सूचना देण्यात येतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.