सातारा जिल्ह्यातील युवकांना स्थानिक पातळीवर (employment) रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. नागेवाडी (ता. सातारा) येथील तब्बल ४२ हेक्टर ५५ आर शासकीय जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी एमआयडीसीकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे साताऱ्यात आयटी पार्क उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या निर्णयानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.
साताऱ्यातील अभियंते तसेच युवक-युवतींना रोजगारासाठी पुणे, मुंबई किंवा इतर राज्यांमध्ये स्थलांतर करावे लागू नये, यासाठीच हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. नागेवाडी (लिंब खिंड) परिसरातील जागा आयटी पार्कसाठी योग्य असल्याचे पाहणीअंती स्पष्ट झाले होते. त्यानुसार एमआयडीसी अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेची तपासणी केली होती.
दरम्यान, गट क्रमांक ३०८/१ मधील ही जागा यापूर्वीच आयटी पार्कसाठी आरक्षित करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी ही जमीन महसूल विभागाकडून एमआयडीसीकडे वर्ग करणे आवश्यक होते. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे आता प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीची प्रक्रिया गती घेणार असून, साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
मुली नकार द्यायच्या, लग्नच जुळेना, प्रचंड नैराश्यातून दोन तरूणांनी… त्या घटनेने महाराष्ट्र हादरला
अखेर ४८ तासांनी इराणने अमेरिकेचा मोठा बदला घेतला, होर्मुझमध्ये खळबळ, एकाच्या बदल्यात तीन
शिल्पा शेट्टीच्या बहिणीचं राकेश बापटसोबत ब्रेकअप, शमिता म्हणालेली, ते आयुष्याचं एक पान