कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत असलेल्या संजय औद्योगिक वसाहतीमधील उज्वला इंडस्ट्रीज कारखान्याला बुधवारी सकाळी (Kupwad) अचानक आग लागली. महापालिका व कुपवाड एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कारखान्यातील कच्चा माल व यंत्रसामुग्रीचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलिस ठाण्यात नव्हती.

संजय औद्योगिक वसाहतीतील उज्वला इंडस्ट्रीज या कंपनीत बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार काम करत होते. अचानक आग लागल्याचे निदर्शनास येताच सुरक्षा यंत्रणेने तत्परता दाखवत सर्व कामगारांना कारखान्याबाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच महापालिका आणि कुपवाड एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. (Kupwad) दरम्यान, आगीचे प्रचंड लोट आणि धूर परिसरात पसरल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या दुर्घटनेत कारखान्यातील अत्याधुनिक यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली आहे. (Kupwad) तसेच गोदामात साठवून ठेवलेला कच्चा माल आणि विक्रीसाठी तयार असलेला पक्का मालही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीच्या तीव्रतेमुळे कारखान्याचे मुख्य शेड आणि लोखंडी सांगाड्याचेही मोठे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेचा उपाय म्हणून महावितरण कंपनीने काही काळ परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. कारखान्याजवळ मोठी गर्दी झाली होती. यावेळी आयुष हेल्पलाईन टीम आणि पैलवान चंद्रहार पाटील जीवरक्षक टीमदेखील मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा :
शरद पवार सत्तेत सामील होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत काय घडलं?