काळाचा घाला! पाणी आणायला गेले अन् एसटीने बाप-लेकाला चिरडले; 

भंडारा येथे आज संध्याकाळी भीषण अपघात घडला असून एसटी बसने दुचाकीला धडक (terrible accident) दिल्याने बापलेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भंडारा एसटी डेपोत घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृतांमध्ये रोहित खेडकर (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रौनक खेडकर यांचा समावेश आहे. रोहित खेडकर हे भंडारा शहरातील चांदणी चौक येथील रहिवासी असून त्यांचा पिण्याच्या पाण्याचा आरो प्लांटचा व्यवसाय होता. ते शहरात पाण्याचा पुरवठा करत होते. दरम्यान, रिकाम्या पाण्याच्या कॅन आणण्यासाठी ते आपल्या मुलासह दुचाकीने एसटी डेपोत गेले होते. याचवेळी एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक एसटी डेपो आणि शासकीय रुग्णालयात जमा झाले. संतप्त जमावाने एसटी चालकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती तणावपूर्ण बनल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत विरार परिसरातही अपघात घडला. विरार महामार्गावरून शहराकडे येत असताना एका कारचालकाने रस्त्यात आलेल्या लहान मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने कार नाल्याच्या भिंतीला धडकून थेट नाल्यात कोसळली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली असून क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्यात आली.

हेही वाचा

आप पक्षाला मोठा धक्का राघव चड्ढासह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

ऐकायला कमी येतंय, आहारात या पदार्थांचा समावेश करा दिसून येईल फरक

 27 एप्रिलला सर्वात दुर्मिळ योग, 3 लकी राशींचं नशीब फळफळणार, पैशांचा पाऊस पडणार?