वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या इचलकरंजी शहराला केवळ यंत्रमागाचाच नव्हे तर पुरोगामी वैचारिक चळवळीचाही मोठा वारसा लाभला आहे. या वैचारिक वारशाचे ज्वलंत प्रतीक म्हणजे समाजवादी प्रबोधिनी. या संस्थेने वैचारिक, सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात एक दीपस्तंभ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ’ हे ब्रीदवाक्य बाळगून, ११ मे १९७७ रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने या संस्थेची स्थापना झाली. (Ichalkaranji) आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांचे सैद्धांतिक प्रबोधन घडवून आणणे हा तिचा मूळ उद्देश होता. इचलकरंजीच्या या प्रबोधिनीचा इतिहास संघर्षातून प्रबोधन साधण्याचा राहिला आहे. कामगार चळवळीपासून ते वस्त्रोद्योगातील मजुरांच्या प्रश्नांपर्यंत अनेक लढ्यात प्रबोधिनीचे कार्यकर्ते अग्रभागी राहिले.
गेल्या चार दशकांहून अधिक काळ या संस्थेने व्याख्यानमाला, अभ्यास शिबिरे, कार्यशाळा आणि राष्ट्रीय पातळीवरील परिसंवाद, श्रमसंस्कार शिबिरे, युवकांसाठी नेतृत्व विकास कार्यशाळा आणि महिला सक्षमीकरण मेळावे आयोजित करण्याचे काम निरंतर चालू ठेवले आहे. देशभरातील नामवंत विचारवंत, लेखक, इतिहास संशोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना बोलावून इचलकरंजीसह अन्य गावांतील शाखांमध्ये वैचारिक देवाणघेवाण घडवली जाते. वैचारिक पोषण केले जाते.
सामाजिक आणि सैद्धांतिक कार्याचा विस्तार म्हणून १९८४ मध्ये सुरू झालेले ‘प्रबोधन वाचनालय’ आज हजारो संदर्भग्रंथ, बाल विभाग आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांनी समृद्ध आहे. तसेच, जानेवारी १९९० पासून नियमित प्रकाशित होणारे ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ हे मासिक विचारवंतांच्या आणि अभ्यासकांच्या पिढ्या घडवत आहे. प्रबोधिनीने केवळ पुस्तकांच्या कपाटात विचार बंदिस्त न ठेवता तो रस्त्यावर आणला, सामाजिक जीवनात आणला. (Ichalkaranji) याशिवाय पुरोगामी विचारसरणीचा प्रसार करणे, संविधान साक्षरता मोहीम राबवणे, राष्ट्रीय एकात्मता टिकवणे आणि व्यसनमुक्तीसारख्या उपक्रमांतून प्रबोधिनीने समाजमनाला नवी ता्त्विवक दिशा दिली आहे.
डॉ. एन. डी. पाटील यांच्यापासून ते विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल गतिमान झाली. सामाजिक न्यायाची चौकट मजबूत करताना कामगार, शोषित व उपेक्षितांच्या बाजूने प्रबोधिनीने सातत्याने वैचारिक भूमिका घेतली आहे. (Ichalkaranji) आज समाजमाध्यमाच्या भाऊगर्दीतही विवेक आणि विज्ञाननिष्ठा टिकवून ठेवण्याचे काम ही संस्था अविरतपणे करत आहे. राजकीय व सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे ऐतिहासिक कार्य समाजवादी प्रबोधिनी इचलकरंजी शहरात अहोरात्र करत आहे. ही संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील पुरोगामी मनाचा जिवंत दस्तऐवज आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?