कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
आम्ही एक आहोत, आमची महायुती अभेद्य आहे, असे एकीचे आणि ऐक्याचे नगारे नेत्यांच्याकडून बडवले आणि वाजवले जात असले तरी विधानपरिषद जागा वाटपावरून सुरू आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक या विधान परिषदेच्या दोन्ही जागा स्वतःकडे घेऊन भारतीय जनता पक्षांने महायुतीमध्ये आम्हीच मोठे भाऊ आहोत असा स्पष्ट संदेश घटका पक्षांना दिला आहे. महायुती मध्ये कोण मोठा आणि कोण लहान असा भेदभाव केला जात नाही असे वारंवार सांगणाऱ्या देवा भाऊंनी एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा पवार यांना “कात्रजचा घाट” दाखवला आहे.

पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाकडे केव्हाही नव्हता. (beating) या मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चांगली तयारी केली होती. शिक्षकांचे मेळावे घेऊन वातावरण तयार केले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या मतदारसंघावर प्रबळ दावा सांगितला होता. ही जागा प्रतिष्ठेची केली होती. पण विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी कौस्तुभ गावडे यांचे नाव या मतदारसंघातून भाजपने जाहीर केले. शिवसेनेच्या उदय सामंत यांनी मंगेश चिवटे यांची उमेदवारी राहणारच असे सांगून भाजपने आम्हाला गृहीत धरून गावडे यांचे नाव जाहीर केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महायुती मधील धुसफुस बाहेर पडली आहे.
कौस्तुभ गावडे यांच्या हातामध्ये राज्यातील मोठी शिक्षण संस्था आहे. शिक्षकांचे एक गठ्ठा मतदान आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांचे ज्येष्ठ सुपुत्र भगवानराव साळुंखे हे पूर्वी या शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. कौस्तुभ गावडे हे बापूजींचे कनिष्ठ सुपुत्र अभय कुमार साळुंखे यांच्या मुलीचे सुपुत्र आहेत. कौस्तुभ यांच्या मातोश्री पूर्वी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव होत्या. (beating) त्यांच्या निधनानंतर शिक्षण संस्थेची सर्व सूत्रे कौस्तुभ गावडे यांच्याकडे आली आहेत. निवडून येण्याची पात्रता असल्यामुळे भाजपने त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. कौस्तुभ गावडे हे तसे भाजपचे उसने उमेदवार आहेत असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही.
एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांच्यासाठी हा मतदारसंघ मागितला होता. तसा जोरदार आग्रह धरला होता. मंगेश चिवटे यांनी महायुतीचे आपणच उमेदवार असणार आहोत असे गृहीत धरून शिक्षकांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली होती. वातावरण तयार करून ते चांगलेच तापवले असतानाच भाजपने कुरघोडी करून या मतदारसंघांमध्ये स्वतःचा उमेदवार दिला आहे. उदय सामंत यांनी जाहीरपणे प्रतिक्रिया व्यक्त करून मंगेश चिवटे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे स्पष्ट केले असले तरी, चिवटे हे रिंगणात असतीलच असे नाही. पुणे पदवीधर विधान परिषद मतदार संघ हा भाजपच्या प्रभावाखाली आहे. प्रकाश जावडेकर हे सलग दोन वेळा या मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी या मतदारसंघांमध्ये दोन वेळा प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यामुळे भाजपासाठी हा सुरक्षित मतदारसंघ आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे एक नेते मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक भैय्या माने यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पूर्व तयारी केली होती. महायुतीकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मुश्रीफ यांची साथ सोडून, राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केला आहे. तथापि या मतदारसंघातून पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांची नात, आणि डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र कुलगुरू तसेच दैनिक पुढारीच्या संचालिका असलेल्या स्मिता योगेश जाधव यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. (beating) त्यामुळे भैय्या माने हे या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याची शक्यता कमी आहे. हसन मुश्रीफ यांनी भैय्या माने यांच्यासाठी पुणे पदवीधर मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी मागितली होती. पण इथेही भाजपाने आपली हुकूमत दाखवली आहे.
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीतही सर्वाधिक ठरावांची संख्या हसन मुश्रीफ यांच्याकडे असूनही त्यांना केवळ एक जागा ज्यादा देऊन (नऊ अधिक एक) त्यांच्या महत्त्वकांक्षेला लगाम घातलेला आहे. एकूणच पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर या जागा स्वतःकडे घेऊन भाजपाने महायुतीत आम्हीच मोठे भाऊ आहोत असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. त्यातूनच महायुती मधील धुसफूस,खदखद बाहेर पडली आहे. मिठाचा खडा पडला आहे असे सुद्धा म्हणता येईल.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय