गोकुळ च्या सफेद दुधाला जात धर्माचा रंग कशासाठी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

इथे पूर्वी एकच गट होता आणि तो म्हणजे आनंदराव पाटील चुयेकर गट होय. त्यानंतर महाडिक, नरके, पाटील हा म.न.पा. गट आला. सहा वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील या गटाच्या हातात सूत्रे आली.आणि प्रशासक येण्यापूर्वी इथे पहिल्यांदा महायुतीच्या माध्यमातून थेट राजकारण आलं. गोकुळ दूध संघाचा हा गटनिहाय प्रवास राजकारणापर्यंत आणि तेथून तो चक्क जात धर्माच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. नाविद मुश्रीफ यांचा पराभव जिव्हारी लागल्यावर हसन मुश्रीफ यांनी त्याचे खापर जात धर्माच्या प्रचारावर फोडले आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून सतत विधानसभेवर निवडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी जात धर्माचा विचार बोलून दाखवावा हे त्यांनी स्वतःच्या वैचारिक बैठकीशी केलेला द्रोह म्हणावा लागेल.

कागल च्या जनतेने मुश्रीफ यांचा धर्म कोणता याचा विचार कधी केला नाही. गैबी चौकातही जात धर्माची भाषा बोलली गेली नाही. फक्त राजर्षी शाहूंच्या विचारांचा सडा या गैबी चौकात आज पर्यंत पडला आहे. स्वतः हसून मुस्लिम यांनी सुद्धा धर्माच्या पलीकडचे आत्तापर्यंत राजकारण केले आहे. त्यांनी फक्त माणूस धर्म पाहिला. आणि (earlier) याच माणूस धर्माने त्यांच्यावर प्रेम केले. सदाशिवराव मंडलिक विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यातील मतभेद हे गुरु आणि शिष्य यांच्यामधील होते. हिंदू मुस्लिम असा धार्मिक रंग त्याला कधीही लागला नाही. आता अचानक त्यांच्याकडूनच जातीयवादाची (धर्मवाद) पार्श्वभूमी गोकुळच्या राजकारणासाठी तयार केली जात आहे. गोकुळच्या निवडणुकीत नाविद मुश्रीफ यांचा ते मुस्लिम आहेत असा प्रचार करून पराभव करण्यात आला हे त्यांचे वक्तव्य चुकीच्या गृहीतकांवर आधारित आहे.

मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर ते जातीयवाद करतात किंवा त्यांनी तो केला आहे असा गंभीर आरोप केला आहे पण प्रशासक येण्यापूर्वी नावीद मुश्रीफ यांच्यावर गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा दुग्धाभिषेक झाला तेव्हा सतेज पाटील यांनी त्याचे स्वागतच केले होते. भारतीय लोकशाहीने बहुमताचे तत्त्वज्ञान स्वीकारले आहे आणि मांडले आहे. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत 25 पैकी 13 जागा जिंकून सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने बहुमत प्राप्त केले आहे. पण हे बहुमत निवडणूक अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत सिद्ध व्हावे लागते. अशा बैठकीसाठी 14 हे संख्या बळ गण पूर्तीसाठी (कोरम)ग्राह्य धरले आहे. तथापि महायुती ने बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे कोरम झाला नाही म्हणून अध्यक्ष निवडीची बैठक तहकूब करण्यात आली. एकाच विषयासाठी कोरम नसेल तर दोन वेळा बैठक तहकूब केली जाते मात्र तिसऱ्यांदा कोरम झाला नाही तर बैठकीचे कामकाज सुरू केले जाते हा नियम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकीसाठी हा नियम आहे. तो सहकारात कदाचित नसावा आणि म्हणूनच बहुमत मिळवलेल्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने निवडणूक अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत समांतर बैठक घेऊन शशिकांत पाटील चुयेकर यांची गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. ही निवड वैध ठरवण्यात यावी यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात अर्थात कोल्हापूरच्या सर्किट बेंच कडे नेण्यात आले आहे.

सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघात सत्ता काबीज करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जमवले आहे.लोकशाहीने सुद्धा बहुमताचे तत्व मान्य केले आहे. अशावेळी कोरम हा तांत्रिक मुद्दा पुढे आणून हसन मुश्रीफ यांनी इथे रडीचे राजकारण सुरू केले आहे. (earlier) त्यावर चर्चा होऊ नये म्हणून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत जातीयवाद आणून माझ्या मुलाचा पराभव करण्यात आला हा मुद्दा त्यांनी पुढे आणला आहे आणि आता (earlier) त्यावरच राजकारण ढवळून निघाले आहे. खिलाडूपणाने पराभव स्वीकारायचा असतो. पराभव का झाला याचे आत्मचिंतन करायचे असते. पण ते न करता हसन मुश्रीफ यांनी दुसराच मार्ग निवडला आहे आणि तो म्हणजे जातीयवादी राजकारणाचा. गोकुळच्या सफेद दुधाला जात धर्माचा रंग कशासाठी? हा सवाल त्यातूनच पुढे आलेला आहे.राजकारण हे चांगल्या गोष्टी नासवून टाकते असे म्हटले जाते ते खरेच म्हणावे लागेल. गोकुळ दूध संघाचे राजकारण सध्या त्याच वाटेवरून चालले आहे.

हेही वाचा : 

मारहाण करून एकाचे अपहरण सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

संजय गायकवाड गोत्यात मोठी कारवाई होणार एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश

अहान शेट्टीच्या ‘सनकी’ या अ‍ॅक्शन ड्रामाच्या शूटिंगला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात