इचलकरंजीत पाणी वाया घालवणाऱ्यांवर महापालिकेचा बडगा, तोटी नसलेली ३१ नळजोडणी खंडित

कोल्हापूर सारख्या पाणीदार जिल्ह्यालाही यंदा दुष्काळाच्या झळा जाणू लागल्या आहेत. (Ichalkaranji) यासाठी महापालिका पातळीवर काही विशेष उपाय योजना केल्या जात आहेत. इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी दुष्काळ उपाय योजना व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय योजना हाती घेतल्या आहेत.

इचलकरंजी महानगरपालिका हद्दीमधील ज्या घरगुती नळ जोडणीला तोटी बसविलेली नाहीत, तसेच ज्या सार्वजनिक नळ कनेक्शनला तोट्या बसविलेल्या नाहीत अशा मिळकतधारकांवर आज पाणी पुरवठा व कर विभागाकडून संयुक्तरित्या वार्ड क्रमांक २१ व २४ मध्ये कारवाई करण्यात आली आहे. (Ichalkaranji) त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. एकूण घरगुती नळ जोडणी खंडित केलेली संख्या वार्ड क्रमांक २४ मध्ये २५, वार्ड क्रमांक २१ मध्ये ६, एकूण ३१ इतकी आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेने लागू केलेल्या या उपाययोजना आता प्रत्यक्षात राबवण्यास सुरुवात झाली असून पाणी हीच खरी संपत्ती आहे, हे लक्षात घेऊन महापालिकेने पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. शहरात अनेक ठिकाणी नळाला तोटी नसल्यामुळे पाणी सतत वाहत राहते. नळ सुरूच राहतो, रस्त्यावर पाणी वाहते, ही बाब वारंवार निदर्शनास येत होती, त्यामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात होते, ही बाब आयुक्त पल्लवी पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पाणी पुरवठा विभागाला तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणी पुरवठा व कर विभागाच्या पथकाने आज वार्ड क्रमांक २१ व २४ मध्ये संयुक्त मोहीम राबवली, या मोहिमेत ज्या घरांमध्ये नळाला तोटी नव्हती, ज्या सार्वजनिक नळांना तोट्या नव्हत्या, अशा ठिकाणांची पाहणी करण्यात आली. संबंधित मिळकतधारकांना यापूर्वी तोटी बसवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे आज अखेर ३१ नळ कनेक्शन कट करण्यात आली. यामध्ये वार्ड क्रमांक २४ मध्ये सर्वाधिक २५ कनेक्शन कट करण्यात आली. तर वार्ड क्रमांक २१ मध्ये ०६ कनेक्शन कट करण्यात आली, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून इतर मिळकतधारकांनीही तातडीने आपल्या नळाला तोटी बसवण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेचे म्हणणे आहे की दुष्काळी परिस्थितीत प्रत्येक थेंब पाणी महत्त्वाचे आहे, एका घरात वाया जाणारे पाणी दुसऱ्या कुटुंबाला जीवनदान देऊ शकते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे, (Ichalkaranji) शहरातील सर्व वार्डांमध्ये टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबवली जाणार आहे, ज्या मिळकतधारकांनी तोटी बसवलेली नाही, त्यांनी तातडीने तोटी बसवावी, अन्यथा त्यांचे नळ कनेक्शन कट केले जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. तसेच सार्वजनिक नळांवरही लक्ष ठेवले जाणार असून सार्वजनिक ठिकाणी पाणी वाया जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, नळ बंद ठेवावा, गळती तातडीने दुरुस्त करावी, असे आवाहन आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे. दुष्काळाच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे इचलकरंजीकरांमध्ये पाणी बचतीबद्दल जागरूकता निर्माण होणार असून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय

सांगलीत बंद शाळेच्या इमारतीतील फर्निचरला आग

राजकारणात मोठा भूकंप 3 आमदार राजीनामा देणार