महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या

दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि इतिहासाची आठवण करून देणारा दिवस मानला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण असते. मराठी अस्मिता, ऐक्य आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या या दिवशी शासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (pride and history) शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, परेड आणि विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना यावेळी आदरांजली वाहिली जाते. देशासह परदेशात राहणारे मराठी बांधवही हा दिवस अभिमानाने साजरा करतात.
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमागे मोठा संघर्ष दडलेला आहे. १९५० च्या दशकात भाषावार राज्यांच्या मागण्या जोर धरू लागल्या होत्या. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्य व्हावे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. मुंबईचा समावेश महाराष्ट्रात व्हावा की वेगळ्या राज्यात, यावरून तीव्र संघर्ष निर्माण झाला.

२१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो आंदोलकांनी निदर्शने केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत १०६ आंदोलक हुतात्मा झाले. त्यांच्या बलिदानानंतर अखेर केंद्र सरकारने निर्णय घेत १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना केली. आज फ्लोरा फाउंटन परिसर ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर विशेष समारंभ घेतले जातात. सरकारी कार्यालये, शाळा आणि अनेक संस्थांमध्ये राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाते. विविध ठिकाणी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम होतात. हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणूनही पाळला जातो.
१ मे हा दिवस केवळ महाराष्ट्र दिन म्हणूनच नव्हे, तर जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगभरातील कामगारांच्या हक्कांच्या लढ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. १८८६ साली अमेरिकेतील शिकागो येथे कामगारांनी आठ तासांच्या कामाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी कामगारांना १५ ते १६ तास काम करावे लागत होते, मात्र योग्य वेतन किंवा विश्रांती मिळत नव्हती. या अन्यायाविरोधात त्यांनी आवाज उठवला.

यानंतर कामगार चळवळीला बळ मिळाले आणि आठ तास काम, योग्य वेतन आणि विश्रांती या संकल्पना जगभर स्वीकारल्या जाऊ लागल्या. त्याच स्मरणार्थ १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात कामगार दिन प्रथम १९२३ साली चेन्नई येथे साजरा करण्यात आला. ‘लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडिया’ने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कामगारांच्या हक्कांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळावी, अशी मागणीही त्यावेळी करण्यात आली होती. अशा प्रकारे १ मे हा दिवस महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि कामगारांच्या संघर्षाचा संगम आहे. हा दिवस इतिहास, बलिदान, मेहनत आणि प्रगतीची प्रेरणा देणारा ठरतो.

हेही वाचा

उदयनराजे भोसले रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत अपडेट

कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा

कोहिनूर हीरा पुन्हा भारतात येणार