पळून गेलेली मुलगी परत आणतो, भोंदूबाबाने स्टॅम्पवर लिहून दिलं, पुढे तंत्र-मंत्रामुळे घडलं असं काही की धक्कादायक प्रकार उघड!

भंडाऱ्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे, पळून गेलेल्या मुलीला परत आणण्यासाठी एका बाबाने तंत्र-मंत्राचा वापर केल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पळून गेलेली मुलगी परत आणून देतो, (Bhandara) असा दावा करत एका भोंदू महाराजाने मुलीच्या वडिलांकडून तब्बल एक लाख रुपये उकळले. विशेष म्हणजे, मुलगी परत आली नाही तर पैसे परत देऊ, अशी हमीही स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आली होती. मात्र मुलगी परत आली नाही आणि पैसेही मिळाले नाहीत. अखेर या प्रकरणाचा अंनिसने भंडाफोड केला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पवनी तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील हेमदास बावणे महाराज यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. शिवशंकर डोरले यांची मुलगी काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेली होती. मुलगी परत यावी यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू होते. त्याचदरम्यान बावणे महाराज जादूटोणा आणि पूजाविधी करून पळून गेलेल्या व्यक्तींना परत आणतात, अशी माहिती डोरले यांना मिळाली.

यानंतर त्यांनी बावणे महाराजांची भेट घेतली. महाराजांनी पूजा केल्यास मुलगी परत येईल, असा दावा केला. इतकंच नाही तर ‘मुलगी परत आली नाही तर पैसे परत देण्यात येतील’, अशी हमी स्टॅम्प पेपरवर लिहून देण्यात आली. या बदल्यात डोरले यांच्याकडून एक लाख रुपये घेण्यात आले. मात्र पूजा करूनही मुलगी परत आली नाही. (Bhandara) त्यानंतर डोरले यांनी स्टॅम्प पेपरच्या आधारे पैसे परत मागितले असता महाराजांनी टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच डोरले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतली. अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी महाराजांची भेट घेत संपूर्ण प्रकाराचा भंडाफोड केला.

या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी चौकशी सुरू करत भोंदू महाराजांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महाराजांनी आणखी किती लोकांना अशाच प्रकारे फसवलं आहे, याचाही तपास आता पोलीस करत आहेत. अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली लोकांची फसवणूक होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. (Bhandara) त्यामुळे नागरिकांनी अशा दाव्यांवर विश्वास न ठेवता कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन प्रशासन आणि अंनिसकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आता एकाचवेळी ४५०० रुपये! ‘ई-केवायसी’ न केलेल्यांना मिळणार नाही लाभ; अधिकाऱ्यांनी सरकारकडे ‘ही’ विनंती, वाचा…

कोरोनापेक्षाही भयंकर! उंदरापासून पसरणाऱ्या विषाणूमुळे खळबळ, ३ जणांचा मृत्यू; १२ देशांना अलर्ट

महत्वाची बातमी! २० मे रोजी राज्यातील सर्व मेडिकल राहणार बंद, नेमकं कारण काय?