शाहू सांस्कृतिक मंदिरासह तीन जागांच्या विकासासाठी फेरनिविदा

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या शाहू सांस्कृतिक मंदिरासह समिती परिसरातील अन्य दोन जागांच्या विकासासाठी फेरनिविदा काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बाजार समितीला सर्वाधिक आर्थिक लाभ मिळवून देणार्‍या ठेकेदारालाच हा प्रकल्प देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, बाजार समितीच्या मालकीच्या शाहू सांस्कृतिक मंदिराच्या विकासाचा विषय गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यापूर्वी या प्रकल्पाचा ठेका अजयसिंह देसाई यांना देण्यात आला होता. मात्र, काही मुद्द्यांवर आक्षेप आणि प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तो ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Kolhapur) त्यानंतर नव्याने फेरनिविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शाहू सांस्कृतिक मंदिरापुरताच हा निर्णय मर्यादित नसून, बाजार समितीच्या परिसरातील आणखी दोन जागांच्या विकासासाठीही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या जागाही खासगी सहभागातून विकसित करण्यात येणार असून, त्या ठिकाणीही आर्थिकद़ृष्ट्या फायदेशीर प्रस्ताव सादर करणार्‍या ठेकेदाराची निवड केली जाणार आहे. यासंदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.(Kolhapur) दरम्यान, बाजार समितीतील बढत्यांच्या विषयावर सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना मुश्रीफ यांनी, या प्रकरणात नियमांनुसार कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

या बैठकीस आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, युवराज पाटील, भैया माने, राहुल पाटील यांच्यासह विविध तालुक्यांतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बाजार समितीच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य देत नव्या निविदेची रूपरेषा तयार केली जाणार असून,(Kolhapur) ज्या ठेकेदाराकडून समितीला अधिकाधिक महसूल मिळेल, त्यालाच प्रकल्पाची जबाबदारी दिली जाईल, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी औषध दुकाने बंद..?

होर्मुझच्या नाकाबंदीमुळे खरीप हंगामावर सावट

मिरजेत एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी..!