राधानगरी (कोल्हापूर) | ता. २५ जुलै
राधानगरी येथील प्रसिद्ध राधानगरी धरण (लक्ष्मी तलाव) आज रात्री १० वाजता पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्याचे दोन स्वयंचलित दरवाजे आपोआप खुले झाले. यामुळे धरणातून तब्बल ४,३५८ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. प्रशासनाने भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण सायंकाळपर्यंत ९९ टक्के भरले होते आणि केवळ अर्धा फूट पाण्याची भर बाकी होती. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने रात्री १०:०१ वाजता दरवाजा क्रमांक ३ आणि १०:२० वाजता दरवाजा क्रमांक ६ स्वयंचलित पद्धतीने उघडले गेले. गेल्या वर्षीही याच दिवशी, २५ जुलैलाच धरण भरून दरवाजे खुले झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेत असलेल्या पावसाने आज जिल्ह्यात जोरदार पुनरागमन केले. शहरात हलक्या सरी तर धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पंचगंगा नदीची पातळी अडीच फूटांनी वाढली आहे. सध्या आठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
म्हाताऱ्या पावसाचे नक्षत्र काही दिवसांपूर्वी निघाले असले तरी, प्रत्यक्षात पावसाचा पुरेसा जोर दिसून आला नव्हता. मात्र, काल रात्रीपासून जिल्हाभरात मुसळधार सरी कोसळत असून, शहरात दिवसभर अधूनमधून हलक्या सरींचा अनुभव आला.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जलसाठा आणि हवामान स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले; दोन स्वयंचलित दरवाजे खुले – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा