शाहूंच्या पुरोगामी कोल्हापुरात बुरसटलेल्या विचारांचे लोक?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूर हे पुरोगामी विचारांची राजधानी म्हणून सर्व दूर परिचित आहे. पण या शहरातही बुरसटलेल्या विचारांची काही नतदृष्ट कुटुंबे राहतात. आणि या कुटुंबांनी कोल्हापूरचे नाव मलीन केले आहे. वंशाला दिवा मिळाला नाही तर आपल्या सात पिढ्या नरकात जातील, अशी मानसिकता या कुटुंबांची आहे. अस्मिता काटकर या तरुण विवाहितेच्या आत्महत्येमागील कारणांमुळे इथल्या पुरोगामी विचारधारेला काहीसा धक्का बसला आहे.काटकर मळा परिसरात राहणाऱ्या अस्मिता काटकर या तरुण विवाहितेने, तिला पहिली मुलगीच झाली (Kolhapur) म्हणून तिच्या सासरच्या लोकांच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. इतकेच नाही तर तिच्या माहेरकडून तिने रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने आणले पाहिजेत यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. शेवटी कंटाळून तिने घरात गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

या घटनेने खळबळ तर माजलीच शिवाय अस्मितेच्या अशा प्रकारच्या मृत्यू बद्दल हळहळही व्यक्त झाली.मुलगी जन्माला येता कामा नये, वंशाला दिवाच असला पाहिजे. मुलगाच जन्माला यायला हवा अशा प्रकारची मानसिकता कोल्हापूर सारख्या पुरोगामी शहरात पाहायला मिळते. (Kolhapur) अशा प्रकारच्या मानसिकतेची अस्मिता ही काही पहिलीच बळी नाही तर यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. अस्मितेच्या आत्महत्येबद्दल तिच्या सासरच्या मंडळींच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक होईल. त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला जाईल. या सर्व प्रक्रिया होतील पण अशा प्रकारचे बळी थांबतील असे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

महाराष्ट्र आणि पंजाब ही दोन राज्ये अशी आहेत की, तिथे मुलींचा जन्मदर कमालीचा घसरलेला आहे.मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्याचे प्रतिकूल परिणाम समाजात दिसू लागले आहेत. लग्नासाठी मुली मिळेनाशा झाल्या आहेत. (Kolhapur) त्यातून काही सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत आणि होत आहेत.गेल्या 30/40 वर्षांपासून कोल्हापूर सह अनेक जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या चे प्रकार कमालीच्या पातळीवर वाढलेले आहेत. मातेच्या गर्भातच स्त्रीभ्रूण मारले जाते आहे. तुला मुलगाच झाला पाहिजे, मुलगी झाली तर याद राख अशा प्रकारचा विचित्र हट्ट धरला जातो आहे. आणि मग त्यातून गर्भ लिंग निदान हा प्रकार सुरू झाला. गर्भात स्त्रीभ्रूण असेल तर गर्भपात केला जाऊ लागला. अशा प्रकारचे गर्भलिंग निदान करणाऱ्यांच्या शहरात आणि जिल्ह्यात तसेच राज्यात टोळ्याच निर्माण झाल्या. हे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यानंतर गर्भवती स्त्रियांवर लक्ष ठेवणारी एक यंत्रणाच शासनाने निर्माण केली. आशा वर्कर्स तसेच अंगणवाडी सेविका यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

लक्ष्मीकांत देशमुख हे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी गर्भलिंग निदान केले जाऊ नये यासाठी रुग्णालयातील सोनोग्राफी यंत्रावर सायलेंट ऑब्झर्वर नावाचे एक उपकरण बसवले. त्याचे दृश्य परिणाम चांगले येऊ लागले. सायलेंट ऑब्झर्वर ही संकल्पना राज्य शासनाने उचलून धरली. त्याचे दृश्य परिणाम सकारात्मक दिसू लागल्यानंतर त्याची दखल पंजाब सरकारने घेतली. कारण तिथेही असाच मोठा प्रश्न तयार झाला होता. पंजाबच्या महिला आरोग्य मंत्र्यांनी खास कोल्हापूरला भेट देऊन सायलेंट ऑब्झर्वरची माहिती घेतली होती.सायलेंट ऑब्झर्वर ही संकल्पना रुढ झाल्यानंतरही गर्भलिंग निदान करण्याची मानसिकता मात्र तशीच होती. गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टर मंडळींनी त्यातूनही पळवाट शोधून काढली. डॉक्टर आणि दलाल यांची अभद्र युती झाली. आणि गर्भलिंग निदान प्रकार पुन्हा जोमाने सुरू झाला. गेल्या दोन महिन्यात गर्भलिंग निदान करणाऱ्या अनेक मंडळींच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. काही डॉक्टरना अटक करण्यात आली. त्यामध्ये महिला डॉक्टर सुद्धा होत्या. वंशाला दिवाच पाहिजे या वाढत चाललेल्या मानसिकतेचा फायदा डॉक्टर मंडळी घेऊ लागली.

अस्मिता काटकर हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्नात तिच्या आई-वडिलांनी वारेमाप खर्चही केला होता. लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी अस्मिता ही पैसे देणारे यंत्र आहे असे समजून तिच्या माहेरकडून भरपूर काही घेतले. अस्मिता गरोदर राहिली तेव्हा तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्याकडून आम्हाला मुलगी नको आहे, मुलगाच हवा आहे असा विचित्र हट्ट धरला होता. पण तिला मुलगी झाली आणि तिच्या छळात वाढ झाली. हा शारीरिक आणि मानसिक छळ वाढत गेल्यानंतर, अस्मिता हिने टोकाचे पाऊल उचलले आणि तिने घरातच गळफास लावून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होय.पण हा कायदा अनेक वर्षांपासून धाब्यावर बसवण्यात येऊ लागला. वंशाला दिवा हवा हे बुरसटलेले विचार इथल्या पुरोगामी भूमीत रुजू लागले. कारण इथे गर्भलिंग निदान कमालीच्या पातळीवर होताना दिसते आहे. अशा मानसिकतेचाच अस्मिता काटकर ही बळी आहे. असे यापूर्वी बळी गेलेली आहेत आताही जाताना दिसत आहेत आणि पुढेही जातील. शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी हे लांछन आहे.

हेही वाचा :

इराणची जगाला मोठी धमकी, ज्याची भीती तेच घडले, थेट भारतातही?

सर्दी, खोकल्यावर सोप घरगुती उपाय, रस एकमेव पर्याय, औषधांची गरज नाही?

आषाढी वारीनिमित्त प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय मांसविक्रीवर 15 दिवस पूर्ण बंदी?