कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका (Election)नजरेसमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षात विशेषतः महायुतीच्या घटक पक्षात इनकमिंग जोरात सुरू आहे. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पक्षांतर करणाऱ्या पैकी बहुतांशी इच्छुकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवायची आहे. आणि निवडणुका एकत्र लढल्या जाणार असतील तर मग इच्छुकांच्या गर्दीवर नियंत्रण कसे ठेवणार? समाधान कोणाकोणाचे करणार? या दोन प्रश्नांची उत्तरे निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बंडाळी होणार अशाच स्वरूपाची येणार आहेत.उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महायुती एकत्रित लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

या संस्थांच्या निवडणुकांची (Election)जबाबदारी महायुती मधील स्थानिक नेत्यांच्याकडे सोपवली जाणार असली तरीचंद्रकांत दादा पाटील यांच्याकडेच सर्व सूत्रे असतील असे सध्याचे वातावरण आहे. किमान भारतीय जनता पक्षाची जबाबदारी त्यांच्याकडेच दिली जाणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी केलेल्या वक्तव्याला अधिक महत्त्व आहे. भाजप आणि शिवसेना यांची राज्यात युती होती तेव्हा कोल्हापूर महापालिकेची निवडणूक युतीच्या वतीने लढवण्यात आली होती. तेव्हा चंद्रकांत दादा पाटील हे विधान परिषदेचे आमदार होते, पण त्यांच्याकडेच या निवडणुकीची जबाबदारी होती.

तेव्हा त्यांनी कोल्हापूर महापालिकेत युतीची निर्विवाद सत्ता येईल असे ठामपणे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र युतीला मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते.नंतरच्या काळात चंद्रकांत दादा पाटील हे युती सरकारमध्ये मंत्री झाले. आणि महापालिकेच्या गत निवडणुकीत त्यांनी महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी युती केली होती. या युतीला चांगले यशही मिळाले होते. विशेष म्हणजे ताराराणी आघाडीपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या जागा जास्त निवडून आलेल्या होत्या. तारारामी आघाडीच्या 14 आणि भारतीय जनता पक्षाच्या 19 अशा 33 जागांवर युतीने विजय मिळवला होता. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भाजपच्या गत निवडणुकीच्या चांगल्या कामगिरीची पार्श्वभूमी आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेपेक्षाही अधिक यश मिळाल्यानंतर महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर लक्ष केंद्रित केलेले आहे.
सर्वच ठिकाणी महायुतीची सत्ता आली पाहिजे असा निर्धार करून या निवडणुकांची पूर्वतयारी सध्या सुरू आहे.महायुती मधील प्रत्येक या घटक पक्षाला या निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवावयाच्या आहेत, त्या जिंकूनही आणावयाच्या आहेत.प्रत्येक राजकीय पक्षाकडून निवडून येण्याची पात्रता असलेल्या उमेदवारांचा सध्या शोध सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून अशा मातब्बर इच्छुकांना आपल्या पक्षाच्या वळसांनी खाली आणण्याचे जोरदार प्रयत्न गेल्या दोन-तीन महिन्यापासून सुरू आहेत. महायुती मधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत, भारतीय जनता पक्षात सध्या इनकमिंग जोरात सुरू आहे. या दोन पक्षांच्या तुलनेत अजितदादा पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात मागे आहे.महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडी कडूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लावल्या जाणार असल्याचे सध्या तरी सांगितले जाते आहे.
पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या कडे पाहिले तर ठाकरे बंधू या निवडणुकीत एकत्र येतील असे सध्याचे चित्र आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या तर प्रत्येक पक्षाला त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय देता येतो.म्हणजे बंडखोरी फारशी होत नाही. निवडणुका एकत्र लढवल्या तर सर्वच इच्छुकांना न्याय देता येत नाही. ज्या हेतूने आपण पक्षप्रवेश केलेला आहे तो हेतूच सफल होत नसेल तर कार्यकर्ता वेगळा विचार करतो आणि त्याचा फटका संबंधित पक्षाला बसतो.कोल्हापूर महापालिकेचेप्रातिनिधिक म्हणून उदाहरण द्यायचे झाले तर, इच्छुकांच्या भाऊगर्दीत उमेदवारी द्यायची कुणाला हा प्रश्न नेत्यांच्यासाठी डोकेदुखीचा ठरतो. कोल्हापूर महापालिकेत 80 ते 100 या दरम्यान सदस्य संख्या असणार आहे.
या संख्येचा विचार करता राजकीय पक्षांच्या वाट्याला फार कमी जागा येतात. महायुतीचा विचार केला तर तिथे तीन घटक पक्ष आहेत आणि त्यांना सर्वसाधारण प्रत्येकी 30 जागा वाट्याला येऊ शकतात. पण प्रत्यक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. अस्तित्वात येणाऱ्या सभागृहाची सदस्य संख्याप्रत्येक पक्षाला वाट्याला येणाऱ्या जागा आणि इच्छुकांची संख्या हे प्रमाण अतिशय विसंगत आहे.वाढत्या बंडखोरीला नियंत्रणात आणण्यासाठीस्वतंत्रपणे निवडणूक लढवायची आणि निवडणुकीनंतर सत्तेसाठी एकत्र यायचे असा राजकीय विचार केला तर, इच्छुकांना बऱ्यापैकी न्याय देता येऊ शकतो. हा विचार सुद्धा नजीकच्या काळात वरिष्ठ पातळीवर केला जाणार असल्याची शक्यताही अधिक दिसते.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींनो हफ्ता जमा झाला का? भावाने पाठवलं रक्षाबंधनचं गिफ्ट
महाराष्ट्रात निवडणुकीत घोटाळा, कर्नाटकातही बोगस मतदान…;राहुल गांधींनी थेट पुरावेच दाखवले
शेअर बाजार, तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज! हे स्टॉक्स गुंतवणूकदारांसाठी ठरू शकतात फायदेशीर