विलीनीकरणाच सुटलय वारे! कुणाची होणार बंद दारे ?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे. हा पर्याय मजबूत करावयाचा असेल तर प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे. अशी चर्चा सध्या सुरू आहे. काँग्रेस गोटातून सुरू झालेल्या या चर्चेचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे. अर्थात ते अशक्य आहे.पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या फुटी नंतर या पक्षाने आता राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन झाले पाहिजे अशी चर्चा सुरू झाली आहे. (National Congress) त्याचे कारण असे आहे की ममता बॅनर्जी या मूळच्या काँग्रेस संस्कृतीमधीलच आहेत. त्यामुळे त्यांनी जो काही त्यांचा पक्ष उरला आहे, तो काँग्रेसमध्ये विलीन करावा असा सल्ला काहीजण देत आहेत. कदाचित नजीकच्या काळात तसे घडेलही. पण त्यामुळे काँग्रेस मजबूत होणार आहे का?

महाराष्ट्र काँग्रेस चे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार यांनीच पूर्वी तसे बोलून दाखवले होते. पण काही ना काही कारणामुळे ते घडले नाही. आता मात्र शरद पवार यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा असे ते सांगत सुटले आहेत. पण त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस कडून तातडीने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. किंवा त्याबद्दलचा इन्कार ही केला गेलेला नाही. (National Congress) त्यामुळे नाना पटोले सांगतात त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. एकेकाळी राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय मान्यता निवडणूक आयोगाने खालसा केली आहे.

तो प्रादेशिक पक्ष राहिलेला असतानाच त्यांच्या पक्षातही मोठी फूट पडली. त्यांच्या गटाची”उरला सुरला पक्ष”अशी अवस्था झाली आहे. शरद पवार यांचा केडर बेसही हलला आहे. बहुतांशी कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रिकरण होणार अशी चर्चा गेल्या तीन चार महिन्यापासून सुरू होती. पण तसे काही होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार यांनी सध्यातरी त्यांचा गट मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. तशा त्यांनी हालचालीही सुरू केलेल्या आहेत. याचवेळी नाना पटोले यांनी शरद पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. आणि असे आवाहन करताना हा विचार माझा नसून शरद पवार यांचाच होता हे सांगण्यास ते विसरलेले नाहीत.

शरद पवार यांचं राजकारण भल्याभल्यांना समजलेले नाही. वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडून पुलोदचा प्रयोग केला तेव्हा त्यांनी समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा औरंगाबाद येथे दौरा असताना शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली आणि ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. तेव्हाचा काळ वेगळा होता. भाजप हा प्राथमिक अवस्थेत होता.आत्ताचा काळ वेगळा आहे. भाजप मोठा झाला आहे आणि इतर पक्ष छोटे झाले आहेत. शरद पवार यांनी त्यांचा गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन केला तरी त्याचा काँग्रेसला किती आणि शरद पवार यांना किती राजकीय फायदा होणार या प्रश्नाचे उत्तर राजकीय विश्लेषकांना शोधावे लागेल.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे प्रवक्ते यांनी खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला आहे. पण त्यांचा उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला त्यांना कोणी दिला तर त्यांची काय प्रतिक्रिया असेल? इतर प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामागचा अर्थ असाही होतो की, राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष कमकुवत झालेला आहे. आणि आता त्या पक्षाला भाजपाला एक मजबूत पर्याय म्हणून पुढे यावयाचे आहे. पण काँग्रेसच्या आवाहनाला किती पक्ष प्रतिसाद देतील? आपली स्वतंत्र ओळख पुसण्याचा प्रयत्न कोण करेल?

महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली. (National Congress) त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पाडली. असे आरोप भारतीय जनता पक्षावर गेल्या काही वर्षांपासून होत आहेत. आता ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्येच मोठी फूट पाडल्यामुळे भाजप हा प्रादेशिक पक्ष फोडतोय असा साधार आरोप होऊ लागला आहे.आपलाही उरला सुरला पक्ष भाजप गिळंकृत करेल या भीतीतून विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर