मान्सून थबकला जिल्ह्यात ७० टक्के पावसाची तूट

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढू लागली आहे. (Monsoon) गेल्या चार दिवसांपासून ग्रामीण भागात सुरू असलेली हलकी रिमझिमदेखील आता पूर्णपणे थांबली असून वातावरणात उकाडा वाढला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, पावसाळ्याच्या पहिल्या १२ दिवसांत कोल्हापूर शहरात सरासरीच्या तुलनेत ६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये १२ जूनअखेर सरासरी १४५.२ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Monsoon) त्यामुळे जिल्ह्यात सुमारे ७० टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे.गेल्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात पावसाची नोंद झालेली नाही. ढगाळ वातावरण कायम असले तरी पाऊस पडत नसल्याने सापेक्ष आर्द्रता वाढली असून उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शुक्रवारी कमाल तापमानात ३.६ अंश सेल्सिअसची वाढ होऊन तापमान ३४ अंशांवर पोहोचले, तर किमान तापमान २.२ अंशांनी वाढून २४.६ अंशांवर नोंदवले गेले.

धरण क्षेत्रातही पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. प्रमुख जलस्रोतांच्या परिसरात पावसाचा अभाव कायम असून केवळ पाटगाव येथे किरकोळ ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Monsoon) यामुळे जलसाठ्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.१२ जूनअखेर कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ४३.६ मिमी, तर शहरात ३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून सक्रिय होण्याची प्रतीक्षा आता शेतकरी आणि नागरिकांना लागून राहिली आहे.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर