कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि कृतिशील विचारांचे आभाळ निर्माण करणारे राजर्षी शाहू महाराज यांची शुक्रवारी 153 वी जयंती नेहमीच्याच उत्साही वातावरणात संपन्न झाली.यानिमित्ताने प्रति वर्षाप्रमाणेच यंदाही राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर करण्यात आला. पण त्यांच्या विचाराने आपण खरोखरच चाललो आहोत का? याचे सर्वांनीच अतिशय गांभीर्याने आत्मचिंतन केले पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 75 वर्षात तसेच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर महाराष्ट्रात किती जिल्ह्यांमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या जलव्यवस्थापनाचे धडे गिरवण्यात आले? आजही मराठवाड्याला दुष्काळातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी किती प्रयत्न झाले? त्यावर किती निधी खर्च झाला? महाराष्ट्रातील किती जमीन ओलिताखाली आणली?

राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात करवीर संस्थान मध्ये शिक्षण सक्तीचे केले होते. आपली मुले शाळेत न पाठवणाऱ्या पालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. मुलींचा शैक्षणिक स्तर वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना बक्षीस देण्याची प्रथा चालू केली होती. एकही विद्यार्थी शालाबाह्य राहता कामा नये यासाठी त्यांनी कसोशीचे प्रयत्न केले होते. (Rajarshi Shahu Maharaj) आज शालाबाह्य विद्यार्थ्यांची राज्यात मोठी संख्या आहे. इयत्ता दहावी नंतरचे गळतीचे प्रमाण नजरेत भरावे इतके आहे. सुरू करण्यात आलेल्या साखर शाळा, पाषाण शाळा बंद पडलेल्या आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी जाती अंताची चळवळ सुरू केली होती. त्यांच्या काळात जातकलह कुठेही झालेला नव्हता. मागास आणि सवर्ण यांच्यात कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती.आज मात्र राज्यात आरक्षणाचे लढे सुरू आहेत. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध आदिवासी असे वर्ग संघर्ष सुरू आहेत.
राजकारण्यांनी जातीपातीचे राजकारण करताना जातीच्या भिंती आणखी मजबूत कशा होतील याची दक्षता घेतलेली आहे. निवडणुकीत जात निहाय उमेदवारी दिली जाते.उमेदवाराची जातही पहिली जाते. (Rajarshi Shahu Maharaj) यामुळेच जातीच्या भिंती अधिक मजबूत झाल्या. राजर्षी शाहू महाराजांनी सांस्कृतिक क्षेत्राचाही विकास केला होता. कलेला आणि कलाकारांना प्रोत्साहन दिले होते. चित्रकार, गायक यांना दरबारात नेमणुका दिल्या होत्या. आज शेकडो कलाकारांना दरमहा मानधन दिले जाते तथापि गेल्या काही महिन्यांपासून हे कलाकार थकीत मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूरसह राज्यातील बहुतांशी सिनेमागृहे बंद पडलेली आहेत. नितीन देसाई यांचा स्टुडिओ विकत घेण्याचा विचार सरकार करत असताना कोल्हापुरातील दोन्ही स्टुडिओ बिल्डरच्या घशात गेलेले आहेत. चित्रनगरी पूर्णपणे विकसित झालेली नाही.
कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हटले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी ही ओळख करून दिली होती. पण त्यांनीच स्वतः पुढाकार घेऊन इसवी सन 1912 मध्ये बांधलेल्या शाहू खासबाग मैदानाची आजची अवस्था काय आहे? गेल्या अनेक वर्षात या मैदानात पैलवानांचा शड्डू घुमलेला नाही.2022 मध्ये राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. त्यावेळी काही संकल्प सोडण्यात आले होते त्याचे काय झाले? राजर्षी शाहू महाराजांनी कृती शील विचारांचे आभाळ निर्माण केले होते. त्याचा आदर्श आपण घेत आहोत का या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. प्रतिवर्षी दिनांक 26 जून रोजी राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी करायची. विचारांचा जागर करायचा. त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करायचे.
इतक्या मर्यादित राजर्षी शाहू महाराजांना ठेवण्यात आले आहे. (Rajarshi Shahu Maharaj) त्यामुळे या राज्यातील राज्यकर्त्यांना, नेत्यांना खऱ्या अर्थाने शाहू महाराज कळाले आहेत का? शासकीय, निमशासकीय किंवा तत्सम संस्थांच्या वतीने, सामाजिक संस्थांच्या वतीने अनेक कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जातात. तेव्हा विचार मंचावरून बोलणारे वक्ते किंवा मंत्री आपल्या भाषणाची सुरुवात करताना राजर्षी शाहू महाराजांचे नाव आवर्जून घेतात. राजश्री शाहू महाराजांचा विचार घेऊन आम्ही राज्य करत आहोत किंवा पुढे जात आहोत असे ते सांगत असतात. पण विचार मंचावरून खाली उतरले की शाहू महाराज विसरले जातात हे आजचे वास्तव आहे आणि ते कुणालाही नाकारता येणार नाही.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?