जल व्यवस्थापनाचे तीन तेरा पाच दशकांनंतर पाणीबाणी!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान कमालीच्या पातळीवर वाढल्यामुळे एल निनो सक्रिय झाला आहे. (water) त्याचे प्रतिकूल गंभीर परिणाम जागतिक स्तरावर होत आहेत. विशेषतः भारताचा पावसाळी हंगाम लांबणीवर गेला आहे. अद्याप पेरण्या झालेल्या नाहीत. दुष्काळाची छाया गडद होताना दिसते आहे. तब्बल पाच दशकानंतर महाराष्ट्रात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरातही अशीच स्थिती आहे.

पन्नास वर्षांपूर्वी पावसाने दडी मारली होती. कृत्रिम पावसाचा प्रयोगही फारसा यशस्वी झालेला नव्हता. जो काही पाणीसाठा उपलब्ध होता तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्याचे तेव्हा नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात फार गंभीर आणि भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. राज्य शासनाला दुष्काळ जाहीर करावा लागला होता. तसा तो अनेकदा जाहीर केला गेला होता.(water) पण त्याची तीव्रता कमी होती. तहानलेल्या गावांना टँकर मधून पाणी पुरवठा करण्याची उपाय योजना तेव्हा करण्यात आली होती. ती कमी अधिक प्रमाणात आजही केली जाते.असा कोल्हापूर जिल्हा हा जलसमृद्ध म्हणून ओळखला जातो. येथील नद्या बारमाही वाहतात. पण पन्नास वर्षांपूर्वी आजच्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा महापालिकेने तातडीने काही पाऊले उचलली होती. शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत किती आहेत याचे सर्वेक्षण तेव्हा करण्यात आले होते. प्रसंग पडला तर हे सर्व खाजगी पाण्याचे स्रोत अधिग्रहित करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने अर्थात जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. तेव्हा कुपनलिका फारश्या प्रमाणात नव्हत्या.

तेव्हा कोल्हापूर शहरात 500 पेक्षा अधिक पाण्याचे नैसर्गिक स्रोत उपलब्ध होते.खाजगी मालकीचे हे पाण्याचे स्रोत अधिग्रहित करून ते सार्वजनिक करण्याचे नियोजन करण्यात आले होते. भारतामध्ये यंदा सरासरी 98% पर्जन्यमान असल्याचे काही अधिकृत संस्थांनी मे महिन्यात जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी एल निनो सक्रिय झाला आणि त्याचे प्रतिकूल परिणाम भारतातील पर्जन्यमानावर झाले. गेल्या मे महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झालेला पाऊस तब्बल सहा महिने सुरू होता. यंदा जून महिन्याचा उत्तरार्ध मान्सूनची प्रतीक्षा करतो आहे. महाराष्ट्रातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणातील पाणी संचय 30 टक्क्याहून खाली आलेला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात तीन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचे बाष्पीभवन होण्याचा हा पहिलाच प्रसंग म्हणावा लागेल.

कोल्हापूर शहराला काळमवाडी धरणातून थेट पाईप लाईनच्या माध्यमातून पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदा मात्र धरणातील पाणीसाठा कमालीच्या पातळीवर घटला असल्यामुळे या योजनेतील पाणी कोल्हापूर वाचण्यासाठी बंद झाले आहे. आता पुनश्च शिंगणापूर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा केला जातो आहे. जिल्ह्याची भूजल पातळी खालावली आहे. कोल्हापूर महापालिकेकडून केले जाणारे पिण्याच्या पाणीपुरवठ्याचे जल व्यवस्थापन फसले आहे.उत्तम जलव्यवस्थापनासाठी कोल्हापूर महापालिका केव्हाच प्रसिद्ध नव्हती. यंदा पाऊस लांबल्यामुळे पाणीबाणी सारखी स्थिती उद्भवली आहे, मात्र कोल्हापूर महापालिकेने त्यावर मात करण्यासाठी प्रभावी उपाय योजना केली आहे असे दिसत नाही. एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. जल व्यवस्थापनाची स्थिती उत्तम असती तर यंदा पाऊस लांबला तरी शहरासाठी पाणीटंचाई झाली नसती.

125 वर्षापूर्वी कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तो सलग तीन वर्षे होता. या दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी यशस्वी प्रयत्न करून जलव्यवस्थापन कसे असावे याचे उत्तम उदाहरण घालून दिले होते. (water) तेव्हा त्यांनी संस्थानांमध्ये साठ मोठे तलाव आणि मोठ्या आकाराच्या तेराशे विहिरी खोदल्या होत्या. कळंबा तलाव आणि राधानगरी धरण हा या जलव्यवस्थापनाचा एक भाग होता. त्यामुळेच कोल्हापूर जिल्हा हा जलसमृद्ध जिल्हा ओळखला जाऊ लागला होता. इथल्या नद्या बारमाही वाहणाऱ्या होत्या. राजर्षी शाहू महाराजांनी अशा प्रकारे उत्तम जल व्यवस्थापन करून दुष्काळावर कायमस्वरूपी मात केली होती. मर्यादित साधने असताना दुष्काळावर त्यांनी मात केली होती. आजच्या घडीला साधनांची कमतरता नाही तर मग उत्तम प्रकारचे जल व्यवस्थापन का करता येत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

हेही वाचा :

पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग

शालेय बस-व्हॅन शुल्कात तब्बल 15 टक्क्यांनी वाढ?

पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?