शिरोळ तालुक्यातील नांदणी गावासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘महादेवी’ उर्फ माधुरी हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग आता मोकळा होत असून तब्बल वर्षभरानंतर तिच्या परतीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पुढील महिनाभरात माधुरी पुन्हा नांदणीत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

माधुरीच्या पुनर्वसन आणि पुनरागमनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून गुजरातमधील वनतारा संस्थेचे विशेष पथक सोमवारी नांदणीत दाखल झाले. पथकाने माधुरीसाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्राची पाहणी केली. (Madhur Hattini) यावेळी नांदणी मठातील पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. माधुरीच्या सुरक्षित परतीसाठी आवश्यक सुविधा, देखभाल व्यवस्था आणि पुनर्वसन आराखड्याचा आढावा घेण्यात आला.महाराष्ट्र शासन, नांदणी मठ आणि वनतारा संस्था यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक संवाद सुरू असून त्यातून पुनरागमनाचा मार्ग अधिक स्पष्ट होत आहे. सर्व संबंधित यंत्रणांकडून आवश्यक प्रक्रियांची पूर्तता केली जात असल्याने माधुरीच्या नांदणीतील पुनर्वसनाबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
माधुरी हत्तीणीला २८ जुलै २०२५ रोजी वनतारा येथे हलविण्यात आले होते. (Madhur Hattini) त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भावनिक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी तिच्या पुनरागमनाची मागणी केली होती. गेल्या वर्षभरात विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. आता या प्रयत्नांना यश मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.नांदणी मठ आणि वनतारा यांच्या समन्वयातून सुरू असलेल्या प्रक्रियेला अंतिम स्वरूप मिळाल्यास लवकरच माधुरीचे पुन्हा एकदा नांदणीत आगमन होणार आहे. (Madhur Hattini) तिच्या परतीच्या प्रतीक्षेत असलेल्या भाविकांसाठी आणि ग्रामस्थांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरणार आहे.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग