कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळताना दिसतात. हा गट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन. डी. ए. मध्ये दाखल होईल किंवा बाहेरून पाठिंबा देईल अशी चर्चा गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. शरद पवार यांच्याकडून या याविषयी स्पष्ट खुलासा झालेला नाही. याचा अर्थ नजीकच्या काही दिवसात राजकारणात काहीही घडू शकत असा होतो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही वेगळ्या बातम्या चर्चेत येतात तेव्हा तेव्हा आमदार जयंत पाटील यांचेच नाव पुढे येते. आताही ते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते विनोद तावडे यांची एका हॉटेलमध्ये गोपनीय बैठक झाली असल्याचे वृत्त मीडियामध्ये ठळकपणे पुढे येते आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट एन डी ए मध्ये प्रवेश केला किंवा बाहेरून पाठिंबा दिला तर त्या बदल्यात शरद पवार गटाला कोणते राजकीय फायदा मिळू शकतात, सत्तेत भागीदारी मिळू शकते काय याची चाचपणी जयंत पाटील यांनी यावेळी केली असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी दिवसभर या संदर्भातील वृत्त मीडियामध्ये झळकत असताना जयंत पाटील यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. रोहित पवार यांनी मात्र ही राजकीय पतंगबाजी असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांचे राजकारण भल्याभल्यांना समजलेले नाही. इसवी सन 2014 मध्ये त्यांनी अगदी अचानकपणे तेव्हा अल्पमतात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊन सर्वांना चकित करून टाकले होते. इतकेच नव्हे तर फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले होते.अजितदादा पवार यांचे अपघाती निधन होण्याच्या आधी काही दिवस आणि नंतरही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला जयंत पाटील यांनी तेव्हा दुजोरा दिला होता. सुनेत्रा पवार यांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ही चर्चा थांबली होती. (Nationalist) त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून शरद पवार गट एन डी ए मध्ये सहभागी व्हावा यासाठीचे प्रयत्न केले गेले होते. नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याकडून काही वेगळ्या राजकीय निर्णय घेतला जाऊ शकतो या भीतीपोटी भाजपने बेरजेचे राजकारण जोरात सुरू केले होते.
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांच्या 20 खासदारांनी स्वतंत्र गट करून एनडीएला समर्थन देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑपरेशन टायगर सुरू करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या ऑपरेशनला समर्थन होते. हे ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली होती. एनडीए मध्ये सहभागी व्हावे असे एक गट म्हणत होता तर दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा पवार गटामध्ये सामील व्हावे अशी भूमिका घेत होता. (Nationalist) आता या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची राजकीय भेट अगदी गोपनीयता राखून झाल्याचे वृत्त आहे. ही भेट खरोखरच झाली असेल तर ती शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच झालेली आहे असे म्हणता येईल. कोणता तरी मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या मानसिक स्थितीत शरद पवार आहेत हे अलीकडच्या काही घटना वरून दिसून आले होते. सुनेत्रा पवार यांच्याशी राजकीय हात मिळवणी पवार यांच्याकडून होईल ही शक्यता दिसत नाही. शरद पवार गटाने आपल्या पक्षात यावे असे सुनेत्रा पवार यांनाही मनापासून वाटत नाही. आणि म्हणूनच शरद पवार यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर फारसे आश्चर्य वाटणार नाही. एकूणच महाराष्ट्रातल्या राजकारणात काहीही घडू शकत असे म्हटले तर त्यात काही वावगे नाही.
जानेवारी 2020 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांनी”भारतीय जनता पक्ष सोडून इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी स्थानिक पातळीवर आघाडी करा”असे जिल्हा पातळीवरील नेत्यांना सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेवरून त्यांचा भाजप विरुद्धचा राग लक्षात येतो. (Nationalist) पण त्यांची ही भूमिका लवचिक राहिलेली दिसते. कारण त्यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 2014 मध्ये बाहेरून पाठिंबा दिला होता. आणि आता त्यांच्याच गटातील एक ज्येष्ठ आमदार जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाचे खासदार विनोद तावडे यांच्याशी मुंबईतील एका हॉटेलमध्ये गोपनीय चर्चा करतात, याचा अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते.
हेही वाचा :
इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?
नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?