नाराजी मागची महत्त्वकांक्षा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

राजकीय नेत्यांची महत्त्वकांक्षा सतत रुंदावत असते, विस्तारत असते. कुठल्या ना कुठल्या तरी सत्ता स्थानावर आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यच असले पाहिजेत.अशी मानसिकता गल्लीपासून दिल्लीपर्यंत पाहायला मिळते. छगन भुजबळ हे सुद्धा त्याला अपवाद नाहीत. त्यांना राज्यसभेवर जायचं होतं पण पुतण्याला मंत्रिपदाच्या सिंहासनावर बसवून! पण जमलं नाही आणि म्हणून त्यांनी उघड उघडपणे नाराजीचा सूर लावलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राहून, आपले काही राजकीय दृष्ट्या भले होणार नाही, असा विचार करून त्यांनी शिवसेना फोडली. ते स्वतः काही आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये गेले. तिथे त्यांना मंत्रीपद मिळाले. इसवी सन 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. मग छगन भुजबळ यांनी काँग्रेसची साथ सोडली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना अनेक महत्त्वाची पदे मिळाली. महसूल मंत्री, जलसंपदा मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री (political) अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. मग ते अजितदादा पवार यांच्याबरोबर गेले आणि मंत्री झाले. आजही इथे महायुती सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहत आहेत.दोन वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा त्यांना नाशिक मधून लोकसभेवर जायचे होते. पण अजित दादा पवार यांनी तुम्ही राज्यातच बरे आहात असे सांगून त्यांना 2025 च्या विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आणले.अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय महत्त्वकांक्षा वाढल्या. पण पक्षांतर्गत राजकारणात त्यांचे फारसे काही जमले नाही. छगन भुजबळ यांचेही काहीसे तसेच झालेले दिसते.

सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवरची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर जाण्यास छगन भुजबळ हे इच्छुक होते. अर्थात त्यांना कुणाचा विरोधही तसा नव्हता. पण छगन भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वासमोर एक अट ठेवली होती. मी राज्यसभेवर गेलो तर येवला विधानसभा पोटनिवडणुकीत पुतणे समीर भुजबळ यांना उमेदवारी द्यावी आणि रिक्त होणारी मंत्री पदाची जागा समीर भुजबळ यांना (political) लगेच द्यावी.छगन भुजबळ यांची ही अट पक्ष नेतृत्वाला मान्य होती पण त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची परवानगी घ्यावी लागणार होती. पण छगन भुजबळ यांची ही अट भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी फेटाळून लावली. आपले आणि आपल्या पुतण्याचे राजकीय पुनर्वसन तातडीने होणार नसेल तर मी आहे तिथे बर आहे अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. ते प्रफुल्ल पटेल यांच्या विश्वास वर्तुळातील आहेत. खरे तर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाऊन नंतर केंद्रात मंत्री व्हावयाचे होते. केंद्रात आपण आणि राज्यात पुतण्या असा धूर्त महत्वकांक्षी विचार त्यांनी केला होता. पण त्यांची ही विचारधारा भाजपाला मान्य नव्हती. माझ्या जागी पुतण्याला मंत्री करा ही त्यांची भूमिका पक्षांतर्गत कोणालाही मान्य नव्हती.

राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर छगन भुजबळ हे चांगलेच संतापलेले दिसतात. मी काही शतरंज का खिलाडी नाही. एकाच घरात खासदारकी आमदारकी आणि मंत्रीपद दिले जात असेल तर मग मी काय घोडे मारले? असा त्यांचा सवाल आहे. त्यांचा हा रोख सुनील तटकरे यांच्याकडे आहे. पक्ष नेतृत्वाने मनावर घेतले असते तर मी राज्यसभेवर गेलो असतो आणि पुतण्या समीर हा माझ्या रिक्त होणाऱ्या जागे मंत्री झाला असता. असे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अविभाजित होता, पक्षाची सर्व सूत्रे शरद पवार यांच्याकडे होती तेव्हा छगन भुजबळ यांना पक्षांतर्गत फार महत्त्व दिले जात होते.

समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज हा छगन भुजबळ यांच्या मागे आहे. आणि त्याचा फायदा पक्षाला होतो आहे म्हणून शरद पवार यांनी त्यांना अधिकचे महत्त्व दिले होते. पण आता राजकारण बदलले आहे, संदर्भ बदलले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत, आणि (political) त्यांनी पक्षातील सर्व महत्त्वकांक्षी नेत्यांना समान अंतरावर ठेवण्याचे धोरण अवलंबले आहे. एकूणच छगन भुजबळ यांच्या महत्त्वकांक्षेला सुनेत्रा पवार यांनी कात्री लावली आहे शिवाय त्यांचे पक्षातील महत्त्वही कमी केले आहे.राजेंद्र जैन यांना राज्यसभा उमेदवारी देऊन त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पक्षांतर्गत वाढलेला आवाज कमी केला आहे. या एकूण राजकारणात छगन भुजबळ हे त्यांच्या महत्त्वकांक्षेसह मागे पडले आहेत.

हेही वाचा :

पैशाच्या वादातून मुकादमाचे अपहरण

जिल्ह्यात ‘गांजा’ची शेती, तस्करी जोमात

महापालिकेच्या कारवाईत राज्य शासन हस्तक्षेप करू शकत नाही