राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी शालेय शिक्षण विभागाने पदोन्नती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे. टीईटी पात्रतेबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आल्याने अधिक शिक्षकांना पदोन्नतीची संधी उपलब्ध होणार आहे. (promotion) यासोबतच पदोन्नतीची संपूर्ण प्रक्रिया निश्चित वार्षिक वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याचे आदेशही विभागाने दिले आहेत.

TET पात्रतेच्या नियमात मोठा बदल यापूर्वीच्या नियमानुसार 1 सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच पदोन्नतीसाठी पात्र मानले जात होते. मात्र, आता या नियमात सुधारणा करण्यात आली असून दरवर्षी 1 ऑगस्टपर्यंत टीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांनाही पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भातील सुधारित नियमावली आणि नवीन वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने अधिकृतपणे प्रसिद्ध केले आहे.
याचबरोबर 14 मे रोजी जारी करण्यात आलेले पूर्वीचे शासनपत्र पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. पदोन्नती प्रक्रिया वेळेत, पारदर्शक आणि एकसमान पद्धतीने पार पाडण्यासाठी नव्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पदोन्नती समितीची बैठक घेण्यात येणार असून त्या तारखेपर्यंत संबंधित शिक्षकाचा सेवाकाल, टीईटी, सीटीईटी तसेच इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाणार आहे. (promotion) त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत 31 ऑगस्टपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पात्र शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पदोन्नती प्रक्रियेत एकसमानता राहावी यासाठी शालेय शिक्षण विभागाने वार्षिक वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी 1 जानेवारी रोजी तात्पुरती सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर आलेल्या हरकती आणि आक्षेपांची सुनावणी करून 31 जानेवारीपर्यंत अंतिम सेवाज्येष्ठता यादी जाहीर करण्यात येईल. (promotion) त्यानंतर 15 ते 22 फेब्रुवारीदरम्यान पदोन्नती समितीची बैठक होईल आणि पुढील आठवड्यात पात्र शिक्षकांची शिफारस केली जाईल. 31 मार्चपर्यंत पदोन्नतीचे अधिकृत आदेश देण्यात येतील, तर 2 मे रोजी संबंधित शिक्षकांना जुन्या शाळेतून कार्यमुक्त करून नव्या पदावर रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
या संपूर्ण वेळापत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सोलापूर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 1 ऑगस्टपर्यंत टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांनाही पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय, टीईटी पात्रता नसतानाही पदोन्नती मिळालेल्या किंवा मिळणाऱ्या शिक्षकांना टीईटी अथवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत विशेष मुदत देण्यात आली असून या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?