कोल्हापूर तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावरील महापालिका हद्दीतील २०४ अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणावर आज (गुरुवार) राज्य शासनाच्या नगरविकास विभागात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. नगरविकास विभागाचे अप्पर सचिव असिमकुमार गुप्ता यांच्यासमोर ही सुनावणी होणार असून, यावेळी महापालिकेने सादर केलेल्या अहवालावर शासन कोणता निर्णय घेते, (Tawde Hotel) याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महापालिकेच्या नगररचना विभागाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मंगळवारी नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. या अहवालात तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्त्यालगतच्या परिसरातील २०४ बांधकामे विविध नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या परिसराच्या हद्दीबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. उचगाव ग्रामपंचायत हद्द की कोल्हापूर महापालिका हद्द, (Tawde Hotel) यावरून न्यायालयीन लढाई झाली. उच्च न्यायालयाने २०१४ मध्ये हा परिसर महापालिका हद्दीत असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, २२ एप्रिल २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही हा परिसर कोल्हापूर महापालिकेच्याच हद्दीत असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात २०४ बांधकामे आढळली. यामध्ये निळ्या पूररेषेतील (ब्ल्यू लाईन) ३२, ट्रक टर्मिनस आरक्षित जागेतील १५, हरित पट्ट्यातील ७० आणि न्यायालयीन निर्णयानंतर उभारण्यात आलेल्या ८६ बांधकामांचा समावेश आहे.
सुनावणीकडे जिल्ह्याचेे लक्ष महापालिकेच्या अहवालात न्यायालयीन निर्णयानंतरही ८६ बांधकामे उभारण्यात आल्याचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला आहे.(Tawde Hotel) त्यामुळे या प्रकरणात शासन कोणती भूमिका घेते आणि पुढील कारवाईचे आदेश काय दिले जातात, याकडे बांधकामधारकांसह शहराचे लक्ष लागले असतानाच एका दिवसातच नगरविकास विभागाचे अप्पर सचिव असिमकुमार गुप्ता यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार असून यामध्ये महापालिकेचे अधिकारीदेखील सहभागी होणार आहेत. यामध्ये कोणता निर्णय होतो. त्यावर त्या बांधकामांचे भवितव्य अवलंबून असून सुनावणीकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी