अक्कलकोटमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अडीच लाखांची ८५० किलो निकृष्ट मिठाई जप्त, चार दुकानं बंद

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पेढा व मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई करत ८५० किलो (किंमत २ लाख ५७ हजार ३७० रुपये) संशयित साठा जप्त केला. नियमबाह्य कारभार करणाऱ्या चार विक्रेत्यांना व्यवसाय बंदचे आदेश दिले असून, मुख्य पुरवठादाराचा अन्न परवाना आणि एका आस्थापनेची नोंदणी तात्काळ निलंबित केली आहे.

अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार असलेल्या ‘मे. रंगोली स्वीट मार्ट’ (पिरजादे प्लॉट, अक्कलकोट; मालक- समीर बडेसाहब मकानदार) या आस्थापनेवर पथकाने छापा टाकला. (Food and Drug) तपासणीदरम्यान येथे अत्यंत अस्वच्छ वातावरणात मिठाईची साठवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील ‘अनुसूची-४’ मधील तरतुदी आणि लेबलविषयक नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे उघड झाले. निकृष्ट दर्जाच्या संशयावरून या ठिकाणाहून ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो (किंमत २ लाख ५० हजार २० रुपये) साठा जप्त करण्यात आला. या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, या आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.

प्रशासनाच्या पथकाने १३ नोव्हेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढा व प्रसाद विक्री करणाऱ्या १२ दुकानांची तपासणी केली. या वेळी चार अनौपचारिक नमुने घेण्यात आले असून, ७ हजार ३५० रुपये किमतीचा २१ किलो स्वीट हलवा जप्त करून नष्ट करण्यात आला. (Food and Drug) यामध्ये ‘मे. रंगोली स्वीट मार्ट’मधून १८ किलो (किंमत ६ हजार ३०० रुपये) आणि ‘मे. सलीम मकानदार पेढा स्टॉल’मधून ३ किलो (किंमत १ हजार ५० रुपये) स्वीट हलव्याचा साठा जप्त केला. तसेच ‘मे. वटवृक्ष स्वामी कृपा स्टोअर्स’मधून लेमन पेढ्याचा नमुना घेण्यात आला. याशिवाय मंदिर परिसर व बेडर गल्लीतील अन्य नऊ प्रसाद व मिठाई विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.

अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी प्रशासनाने स्वामी समर्थ मंदिरासमोरील चार प्रमुख विक्रेत्यांचा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश बजावले आहेत. (Food and Drug) यामध्ये मे. समर्थ स्वीट स्टॉल, मे. पाटील स्वीट शॉप, मे. रंगोली स्वीट मार्ट आणि मे. सलीम मकानदार पेढा स्टॉल यांचा समावेश आहे. यासोबतच मंदिरासमोरील मे. गुरुकृपा पूजा भंडार या आस्थापनेची नोंदणी निलंबित करण्यात आली आहे. सहआयुक्त (अन्न) श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे आणि हिरेमठ यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली. तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही मोहीम तीव्र करण्यात आली असून, नागरिकांनीही खरेदी करताना दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : 

मोठी बातमी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, मनसेत मोठा पक्षप्रवेश, मुंबईत घडामोडींना वेग

अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची गर्दी

हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात