पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? पायरी मार्ग दोन दिवस बंद?

भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ऑरेंज – रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रायगड किल्ल्यावर जाणारा चित दरवाजा–नाणे दरवाजा पायरी मार्ग 8 जुलै ते 9 जुलै 2026 या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश महाडचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पोपट ओमासे यांनी दिले आहेत.

सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला परिसरात दरडी कोसळणे, दगड घसरणे तसेच झाडे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. (Raigad) यापूर्वी रायगडावर अतिवृष्टी झाल्याने पायऱ्यांवर काही पर्यटक अडकले होते तर दरड कोसळण्याच्या घटना या पूर्वी घडलेल्या आहेत.या पार्श्वभूमीवर कोणतीही जीवितहानी टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशानुसार, 8 जुलै ते 9 जुलै या कालावधीत चित दरवाजा व नाणे दरवाजा येथून रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या पायरी मार्गाने पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय प्रशासनाकडून घेतला जाईल. दरम्यान, प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे तसेच प्रतिकूल हवामानात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्यातील १९ धरणे फुल्ल रायगड जिल्ह्यात मागील आठवडाभर पावसाचा जोर कायम असून, (Raigad) यामुळे नद्यांसह धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या मुसळधार पावसामुळे काही गावांना पुराचा फटका बसला आहे. जिल्ह्यातील प्रमुख २८ धरणांतील पाणीसाठा सद्यः स्थितीमध्ये ८४.३७टक्क्यांवर पोहोचला असून, त्यापैकी रोहे तालुक्यातील सुतारवाडी, सुधागड तालुक्यातील कोंडगाव, घोटवडे, कवेळे, उन्हेरे; म्हसळा तालुक्यातील पाभरे, संदेरी आणि महाड तालुक्यातील कोथुर्डे आणि खैरे, वरंध, खिंडवाडी; मुरूड तालुक्यातील फणसाड (Raigad) यासह तळा तालुक्यातील वावा; पेण तालुक्यातील आंबेघर; खालापूर तालुक्यातील भिलवले, कोलते मोकाशी, डोणवत; पनवेल तालुक्यातील मोरबे आणि श्रीवर्धन तालुक्यातील कुडकी अशी १९ धरणे १०० टक्के भरली आहेत. जुलै महिन्यात धरणात मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध झाल्याने रायगडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. पनवेल तालुक्यातील उसरन व बामणोली ही धरणे जवळपास ९० टक्के भरली आहेत. ढोकशेत, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले, रानिवली, कर्जत तालुक्यातील साळोख, अवसरे या धरणांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झालेला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास कमी जलसाठा असलेल्या धरणांमध्ये पाण्याची मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी बनली चिखलकरंजी नागरिक संतप्त महापौरांचे कामे थांबवण्याचे आदेश?

नृसिंहवाडीच्या दत्त मंदिरात दक्षिणद्वार सोहळा कृष्णामाई दत्तगुरूंच्या भेटीला भाविकांची स्नानपर्वणी?

E20 पेट्रोलमुळे गाडीचे इंजिन खराब होणार का?