लिंब येथे अपघातग्रस्त मोटारीतून गुटखा जप्त

तासगाव-विटा रस्त्यावर लिंब गावच्या हद्दीत बेकायदेशीरपणे गुटखा आणि सुगंधी तंबाखू घेऊन जात असलेल्या एका आलिशान मोटारीस अपघात झाला. अपघातग्रस्त मोटारीतून पाच लाखांचा गुटखा जप्त करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. मोटारीसह सुमारे १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. (accident) या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रणव नेताजी जिनगर (वय २६) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गणेश आनंदा निकम (वय ३६, रा. पळशिवणे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर, सध्या रा. कबनूर, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गणेश निकम हा एका आलिशान मोटारीतून (क्र. एमएच १५ सीएम ५८३५) राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधी तंबाखू साठा घेऊन कर्नाटकातून साताऱ्याच्या दिशेने निघाला होता. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तासगाव-विटा रस्त्यावरील लिंब गावच्या हद्दीत डुलकी लागल्याने (accident) त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्याकडेला जाऊन धडकली.अपघाताच्या मोठ्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मोटारीची पाहणी केली असता त्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखू असल्याचे दिसून आले. नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने तासगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संशयित गणेश याला मोटारीसह ताब्यात घेतले.

पोलिसांनी या प्रकाराची माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिली. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी प्रणव जिनगर हे अनिल पवार यांच्यासह तासगाव पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांनी केलेल्या पंचनाम्यात ४ लाख ३५ हजार ६०० रुपयांचा गुटखा आणि ४८ हजार ४०० रुपयांची सुगंधी तंबाखू, असा एकूण ४ लाख ८४ हजार रुपयांचा प्रतिबंधित माल आढळून आला. पोलिसांनी हा गुटखा आणि ७ लाख रुपये किमतीची मोटार, (accident) असा एकूण ११ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलिस निरीक्षक विशाल टकले, सहायक निरीक्षक बिरुदेव काबुगडे, सहायक निरीक्षक दीपक पाटील, दादासाहेब तावरे, प्रशांत चव्हाण, विठ्ठल सानप, हणमंत गवळी व प्रताप पवार यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरूदेव काबुगडे करत आहेत.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर