शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी रात्री मद्यधुंद मोटार चालकाने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायबर चौकातील दोघेजण ठार झाले. उमेश विलास पाथरुट (वय ३२) व गणेश सुनील पाथरुट (३४, दोघे रा. पाथरुट गल्ली, सायबर चौक) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी या प्रकरणी मोटारीचा चालक पद्मसिंह पाटील (३६, रा. ओम प्लाझा, कृपलानी हॉस्पिटलजवळ, ताराबाई पार्क) याला अटक केली असून, (accident) त्याच्यावर राजारामपुरी पाेलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधासह ‘हिट ॲण्ड रन’चा गुन्हा दाखल केला आहे.

तो ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा आहे. याबाबत योगेश प्रकाश पाथरुट (वय ३२, रा. पाथरुट गल्ली, सायबर चौक) यांनी आज सकाळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सायबर चौकातील पाथरुट गल्ली येथील उमेश व गणेश रविवारी मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच-०९-एचजे-८२९०) वरून जेवण्यासाठी गेले होते. (accident) यावेळी त्यांच्या मोपेडला विद्यापीठाकडून शाहू टोल नाक्याकडे निघालेल्या इलेक्ट्रीक मोटार (एमएच-०९-एचएच-४९९९) ने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दोघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले.
त्यातील एकजण जागेवर ठार झाला तर दुसऱ्याचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला. अपघातानंतर पद्मसिंह पाटील घटनास्थळावरून पळून गेला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथक अपघातस्थळी दाखल झाले. पाथरुट यांचे नातेवाईक, मित्र परिवार व स्थानिक नागरिकही घटनास्थळी धावले. दोघांना सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात व तेथून सीपीआरमध्ये नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, पद्मसिंह घरी गेल्यावर त्याच्या मोटारीची मोडतोड झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यानंतर ती मोटार घेऊन त्याच्या भावासह अन्य काहीजण पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडील आपल्या हॉटेलकडे लावण्यासाठी निघाले होते. (accident) याचवेळी ते घटनास्थळावरून जात असतानाच अपघातातील मोटार पोलिसांसह नागरिकांनी ओळखली. त्यांना अडविल्यानंतर हा अपघात आपल्या भावाकडून झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांना अपघात भावाकडून झाल्याचे माहीत नव्हते. पोलिसांनाही अपघात कोणी केला, ही खात्री झाल्यावर त्यांनी तातडीने पद्मसिंहच्या घरी जाऊन त्याला अटक केली. त्यानंतर त्याची सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तो मद्यधुंद असल्याचे समोर आले. पोलिसांनी मोटार जप्त केली. साहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल साळुंखे तपास करत आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळी येत पुढील कार्यवाहीबाबत सूचना दिल्या.
अपघातापूर्वी पद्मसिंहची तरुणांसोबत वादावादी अपघात होण्यापूर्वी पद्मसिंह याची पुणे-बंगळूर महामार्गावरील एका हॉटेलजवळ काही तरुणांशी वादावादी झाली होती. त्यानंतर तो रागातच आपल्या मोटारीतून घरी आला व कुटुंबीयांना या वादाबाबत सांगितले. त्यामुळे भावाने त्याच्या मोटारीची किल्ली काढून घेतली. पद्मसिंहाने आपल्या भावाची मोटार बाहेर काढली व वादावादी झालेल्या ठिकाणी विसरलेला मोबाईल आणण्यासाठी तो मोटार चालवत निघाला होता. त्यावेळी शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका मार्गावर अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
‘सीसीटीव्ही’बाबत पडताळणी पोलिसांकडून आज सकाळी अपघात झालेल्या परिसरात सीसीटीव्ही आहेत का, याची पाहणी केली. घटनास्थळाच्या जवळपास सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे दिसून आले. अनेकांच्या घरातील कॅमेरे त्यांच्या घराकडे वळवून लावल्याचे दिसून आले. त्यामुळे घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
सदोष मनुष्यवधासह हिट ॲण्ड रनचा गुन्हा संशयित पद्मसिंहवर बी.एन.एस. कलम १०५, २८१, १२५ (अ), १२५ (ब)सह मोटर वाहन कायदा कलम१३४ (अ)(ब), १८४, १८५ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कलम १०५ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा व कलम १८५ प्रमाणे ड्रंक अँड ड्राईव्ह व हिट ॲण्ड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी रोहित पवार यांना भाजपाचं निमंत्रण, थेट नेमकं काय घडतंय