महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अमित ठाकरे भाषणादरम्यान अचानक भावूक झाले. “मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत ते काही काळ व्यासपीठावरून खाली उतरले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (Amit Thackeray) यावेळी विद्यार्थी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही औपचारिक सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अलीकडील विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर ते काय भूमिका मांडणार, याची उत्सुकता होती. मात्र भाषणादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला.
विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत अमित ठाकरे म्हणाले, “ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.” त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो. पण मी इथे केवळ त्यांचा मुलगा म्हणून नाही, तर त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे टिकून आहे.”याच वेळी ते भावूक झाले आणि “मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत काही काळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले. सभागृहात क्षणभर शांतता पसरली. (Amit Thackeray) काही वेळानंतर ते पुन्हा मंचावर आले आणि आपले भाषण पूर्ण केले. पुन्हा भाषण सुरू करताना अमित ठाकरे म्हणाले, “मी पाठ करून आलेलो नाही. तुम्हा सर्वांना पाहून धडकी भरली. आतापर्यंत केलेली कामं विसरून जा. आता पुढे काय करायचं आहे, याचा विचार करा. तुमची ताकद तुम्हालाच कळली पाहिजे.”ते पुढे म्हणाले, “गेल्या आठवड्यात आपण विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढत होतो. तो आत्मविश्वास मला तुमच्या पाठिंब्यामुळे मिळाला. माझ्यामागे तुमची ताकद आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती आहे.”
अमित ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर टीका करत सरकारवरही निशाणा साधला. “लोक विकासासाठी मतदान करतात. पण पाच वर्षांत काम न करणाऱ्यांना बदलण्याची वेळ आली, तर मतदारांनी निर्णय घ्यायला हवा,” असे ते म्हणाले. तसेच विद्यार्थी आंदोलन, राज्यातील विविध प्रश्न आणि आगामी काळातील संघटनबांधणीवर भर देत त्यांनी सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.भाषणाच्या शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न राजसाहेबांचं आहे. (Amit Thackeray) त्याचबरोबर महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी विद्यार्थी संघटना उभी करायची आहे. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे.” अमित ठाकरे यांच्या या भावनिक भाषणाची आणि व्यासपीठावरून काही काळ खाली उतरण्याच्या प्रसंगाची कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?