उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम केवळ माणसांवरच नाही तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही होत आहे. विशेषतः स्मार्टफोन जास्त गरम होण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येतात. सततचा वापर, गेमिंग, व्हिडीओ पाहणे किंवा चार्जिंगदरम्यान होणारी उष्णता (smartphone) यामुळे फोनचे तापमान वाढते. अशा वेळी काही चुकीच्या सवयींमुळे बॅटरी आणि डिव्हाइसचे गंभीर नुकसान होऊ शकते.

फोन गरम झाल्यावर या चुका टाळा कडक उन्हात फोन वापरणे, मोठ्या फाइल्स डाउनलोड करणे, दीर्घकाळ गेम खेळणे, ऑनलाइन व्हिडीओ स्ट्रीमिंग करणे किंवा सतत फोनचा वापर करणे यामुळे डिव्हाइसचे तापमान वाढू शकते. याशिवाय फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग, मोबाइल हॉटस्पॉटचा वापर आणि बॅकग्राऊंडमध्ये अनेक अॅप्स सुरू असणे ही देखील फोन ओव्हरहीट होण्याची प्रमुख कारणे आहेत. अशा परिस्थितीत फोन गरम असतानाच चार्जिंगला लावल्यास बॅटरीवर अतिरिक्त ताण पडतो आणि तापमान आणखी वाढू शकते. त्यामुळे प्रथम फोन थंड होऊ द्यावा आणि त्यानंतरच चार्ज करावा.
अनेक जण फोन पटकन थंड करण्यासाठी तो एसीसमोर ठेवतात किंवा थेट फ्रिज व फ्रीझरमध्ये ठेवण्याची चूक करतात. मात्र तापमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे फोनच्या आतील भागात ओलावा तयार होऊ शकतो. (smartphone) त्यामुळे अंतर्गत सर्किट्स आणि इतर महत्त्वाचे घटक खराब होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच फोनवर ओव्हरहीटिंगचा इशारा दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी ब्राइटनेस कमी होणे, चार्जिंग थांबणे किंवा काही फिचर्स बंद होणे ही सामान्य बाब आहे. फोनचा वापर तात्काळ थांबवणे अधिक सुरक्षित ठरते.
फोनचे तापमान वाढल्याचे जाणवल्यास सर्वप्रथम काही काळ त्याचा वापर थांबवावा. गरज असल्यास 10 ते 15 मिनिटांसाठी फोन पूर्णपणे बंद ठेवावा. तसेच वाय-फाय , ब्लूटूथ आणि जीपीएस यांसारख्या सुविधा बंद करून स्क्रीनचा ब्राइटनेस कमी करावा. फोनवर कव्हर किंवा केस लावले असल्यास ते काढून टाकल्याने उष्णता बाहेर पडण्यास मदत होते आणि डिव्हाइस लवकर थंड होते.याशिवाय निकृष्ट दर्जाचे चार्जर, खराब यूएसबी केबल किंवा दोषपूर्ण बॅटरी वापरणे टाळावे. चार्जिंग सुरू असताना गेम खेळणे किंवा व्हिडीओ पाहणे यामुळे प्रोसेसर आणि बॅटरीवर एकाच वेळी ताण येतो, ज्यामुळे फोन अधिक गरम होतो. (smartphone) तसेच कारच्या डॅशबोर्डवर, दुचाकीवर किंवा थेट सूर्यप्रकाशात फोन ठेवणे धोकादायक ठरू शकते. वापरात नसलेले अॅप्स बंद करणे आणि अनावश्यक फाइल्स हटवणे यामुळेही फोनवरील ताण कमी होऊन ओव्हरहीटिंगची समस्या नियंत्रणात राहू शकते.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’