कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या सहा वर्षात महाराष्ट्रातील राजकीय(political) मंचावर विस्मय चकीत घडामोडी घडल्या. काही राजकीय भूकंप सुद्धा झाले. राजकारण्यांची भाषा पातळी घसरली. भाषा सभ्यतेला सोडचिठ्ठी दिली. व्यक्तिगत शत्रुत्व असल्यासारखे नेते भांडताना दिसले. फुटलेले पक्ष पुन्हा एकत्र येणार, ठाकरे बंधू यांच्यात युती होणार अशा चर्चा अजून सुरू झाल्या किंवा तसे वातावरण तयार झाले.

या पार्श्वभूमीवर येत्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. आणि त्या जिंकण्यासाठी प्रामुख्याने महायुती आणि महाविकास (political)आघाडी कडून पराकोटीचे प्रयत्न होणार आहेत. आणि त्याची पूर्वतयारीही सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणाचा सिनेरिओ किंवा चित्र काय असेल? याचा प्रातिनिधिक प्राथमिक अंदाज म्हणून कोल्हापूरच्या निवडणुकांकडे पाहता येईल. कारण बदलत्या राजकारणाचे परिणाम कोल्हापूरच्या राजकारणावरही झालेले आहेत.
कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय चित्र काय असेल याचा प्रथम किंवा प्राधान्याने विचार केला तर संस्थात्मक पातळीवर एकत्र असलेले नेते या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत. त्याचा पूर्व इतिहासही तपासून पाहिला पाहिजे.
महापालिकेची सत्ता सूत्रे महादेवराव महाडिक यांच्याकडे होती तेव्हा सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती हे महापालिकेच्या राजकारणात महाडिक गटात होते. पण नंतर सतेज पाटील यांनी अरब आणि उंटाच्या गोष्टी प्रमाणे महाडिक यांनाच महापालिका सत्तेच्या तंबूतून बाहेर काढले. त्यानंतर या महापालिकेत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे आघाडीच्या माध्यमातून एकत्र आले. प्रशासक राज सुरू होण्यापूर्वी हे दोघे एकत्र होते अगदी राज्यात महाविकास आघाडी सत्तेत होती तोपर्यंत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रवाह बदलले.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अजित दादा पवार(political) हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वळचणीखाली आले. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाली. जे राज्यात घडले तेच कोल्हापुरात घडले.
आज सतेज पाटील हे सत्तेत नाहीत आणि त्यांचे संस्थात्मक सहकारी हसन मुश्रीफ हे सत्तेत आहेत. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत, गोकुळ दूध संघामध्ये एकत्र असलेले सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ हे दोघेही महापालिकेच्या तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध उभे असणार आहेत. या महापालिकेत भारतीय जनता पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष होता. महाडिक गटाची ताराराणी आघाडी आणि भाजप या दोघांनी एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढवली होती. आता महाडिक यांची ताराराणी आघाडी भाजपमध्ये विलीन झालेली आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्र उतरणार आहे. त्यातही भारतीय जनता पक्षाला या महापालिकेत सत्ता हस्तगत करावयाची आहे. त्यांना भाजपचा महापौर करावयाचा आहे. कदाचित या निवडणुकीत महायुती स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल आणि नंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतील अशी शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू आहे. अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या महापालिकेच्या निवडणुकीत फार कमी संधी आहे.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली तरी किंवा नाही झाली तरी सतेज पाटील विरुद्ध हसन मुश्रीफ यांच्यात सत्तेचा सारीपाट रंगणार आहे. सतेज पाटील यांनी त्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. पण गत निवडणुकीत त्यांच्यासोबत असलेले काही महत्त्वाचे सहकारी त्यांच्यापासून दूर होणार असल्याची चर्चा रंगात आली आहे. म्हणूनच त्यांनी आपल्याबरोबर कोण आहे आणि कोण नाही याची चाचपणी करण्यासाठी माजी नगरसेवकांसाठी प्रीती भोजन आयोजित केले होते. ज्यांना माझ्या गटातून बाहेर जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे असा संदेश डिनर डिप्लोमसीतून दिला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचे काही निकटचे सहकारी नाराज झाले होते.
कोल्हापूर महापालिकेचे 28 प्रभाग दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. या मतदारसंघातून भाजपाचे अमल महाडिक विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवाय धनंजय महाडिक हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचाही कोल्हापूर शहरावर काहीसा प्रभाव आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिका निवडणुका जिंकण्याची जबाबदारी चंद्रकांत दादा पाटील आणि महाडिक कुटुंब यांच्यावर भाजपकडून सोपवली जाणार आहे. कोल्हापूर महापालिकेवर भाजपचे एक दोन सदस्य निवडून जायचे. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. सत्ताधारी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने कोल्हापुरात मजबूत स्थान प्राप्त केले आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचे रूपांतर नुकतेच महापालिकेत करण्यात आले आहे. इथे आवाडे कुटुंबीयांची सत्ता राहिली आहे. आता आवाडे कुटुंब भाजपा(political) मध्ये आहे आणि राहुल आवाडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. आवाडे तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश हाळवणकर यांच्या मदतीने इचलकरंजी महापालिकेत भाजपला सत्ता आणावयाची आहे. महाविकास आघाडीची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या शहराचा पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे.
सुळकुड पाणीपुरवठा योजना प्रलंबित आहे. हा प्रश्न सोडवला जाईल असा विश्वास जो कोणी देणार आहे त्याच्या पाठीमागे इथली सर्वसामान्य जनता राहणार आहे. महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांचाच सुळकुड पाणीपुरवठा योजनेला ठाम विरोध आहे. त्यामुळे महायुतीच्या अन्य नेत्यांना यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! 48 तासांत सोन्याच्या दरात 2 हजारांची घसरण
17 मे पासून पुन्हा रंगणार IPL चा थरार; पाहा संपूर्ण शेड्यूल; या दिवशी होणार फायनल
‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी