महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत या कथित पेपरफुटीबाबत गंभीर दावे केले. प्रश्नपत्रिकेसाठी 12 लाख रुपये ठरले होते, त्यापैकी 5 लाख रुपये आगाऊ दिल्याचे आणि उर्वरित 7 लाख रुपये नंतर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीचे रॅकेट कशा पद्धतीने काम करत होते, याबाबत माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी 12 लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. (Commission (MPSC)) यातील 5 लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते, तर उर्वरित 7 लाख रुपये नंतर देण्याचे निश्चित झाले होते. या प्रकरणाचा संबंध बार्शीशी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र, हे आरोप असल्याचे नमूद करत या प्रकरणाचा तपास होणे महत्त्वाचे आहे.
या परीक्षेच्या कट ऑफबाबतही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. कट ऑफ 105 गुणांचा असल्याचे सांगितले जात असताना 103 गुण मिळवलेल्या एका उमेदवाराला मुलाखतीसाठी कसे बोलावण्यात आले, असा सवाल त्यांनी केला. संबंधित उमेदवाराला मुलाखतीची संधी देण्यामागे कोणाचा दबाव होता, याचा शोध घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. एफडीए (FDA) चांगले काम करत असले तरी पैसे देऊन एखादी व्यक्ती औषध निरीक्षक बनली तर ती पुढे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. (Commission (MPSC)) अशा प्रकारे पैसे देऊन परीक्षा पास झालेला अधिकारी नागरिकांना योग्य न्याय देऊ शकणार नाही, असेही पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी नंदुरबारमधील एका नायब तहसीलदाराच्या दोन मुलांच्या निकालाबाबतही प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या माहितीनुसार, संबंधित दोन्ही मुले औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेला बसली होती. मुले गुणवंत असण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी मुलाला 149 गुण मिळून 13वा क्रमांक, तर मुलीला 148 गुणांसह 16वा क्रमांक मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दोघांचे गुण आणि रँक जवळपास सारखे कसे असू शकतात, हा केवळ योगायोग मानायचा का, असा सवाल त्यांनी केला. या बाबीचीही चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
औषध निरीक्षक पदाची परीक्षा 22 मार्च रोजी झाली होती. मात्र, परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे 20 मार्च रोजीच काही प्रश्न व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. संशय निर्माण होऊ नये म्हणून उमेदवारांना त्यातील 10 प्रश्न जाणीवपूर्वक चुकीचे सोडवण्यास सांगण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले. या कथित व्यवहाराशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅटही समोर आल्याचा दावा त्यांनी केला. (Commission (MPSC)) तसेच एका उमेदवाराने 78 प्रश्न सोडवल्याचे आणि उर्वरित प्रश्न स्वतःच्या अंदाजाने सोडवल्याचे चॅटमध्ये सांगितल्याचे पवार यांनी नमूद केले. NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रमाणेच एमपीएससीमध्येही प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरले गेले का, याचा तपास व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले. या संपूर्ण प्रकरणामागे नेमका सूत्रधार कोण आहे, हे शोधणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?