गडहिंग्लजमध्ये आंदोलक-आमदार समर्थक भिडले

गडहिंग्लज ‘तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा’ या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने येथील दसरा चौकात चार दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. चुली मांडून, जनावरांसह मोर्चे काढून आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. सोमवारी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रांत कार्यालयावर काढलेल्या मोर्चात चंदगड मतदारसंघाचे आ. शिवाजी पाटील यांनी उपस्थिती लावली. (Gadhinglaj) यावेळी आंदोलकांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधत शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी आ. पाटील समर्थक आणि आंदोलकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी दोन्ही बाजूकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन समर्थक व आंदोलक एकमेकांना भिडल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सोमवारी पाचव्या दिवशी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध मान्यवरांनी तालुक्याला दुष्काळी यादीत समावेश करून विविध उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली. (Gadhinglaj) यानंतर आंदोलकांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत आ. शिवाजी पाटील यांनी आंदोलकांसमोर दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आपल्याकडून सुरू असलेले प्रयत्न मांडण्यास सुरुवात केली. मात्र आंदोलकांनी शासनासह मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली.

या दरम्यान आमदार समर्थकांनीही आक्षेप घेत आंदोलकांना विरोध केला. (Gadhinglaj) यातूनच दोन्हीकडून जोरदार वादावादी सुरू झाली. ढकलाढकली होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह कॉलर धरण्याचे प्रकार घडले. बराच वेळ हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्हीकडील कार्यकर्त्यांना शांत केले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने आंदोलकांच्या मोर्चाला सामोरे गेलेले तहसीलदार हे आमदारांच्या आढावा बैठकीला निघून गेल्याने संतापलेल्या आंदोलकांनी पुन्हा प्रांत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी जि. प. सदस्य अमर चव्हाण यांनी आक्रमकपणे भूमिका मांडत शासनाला तालुकावासीयांची भावना ऐकायचीच नाही का, असा सवाल केला. यावेळी आंदोलकांना बैठकीला पाचारण करण्यात आले. मात्र तेथेही घोषणाबाजी सुरूच राहिल्याने आंदोलकांना बैठकीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बैठकीत आ. पाटील यांनी खातेनिहाय आढावा घेतला. यावेळी अधिकार्‍यांनी दिलेली माहिती व वस्तुस्थिती यामध्ये विसंगती आढळली. त्यामुळे आ. पाटील यांनी अधिकार्‍यांचा समाचार घेतला. दरम्यान, दिवसभरात झालेल्या या प्रकारावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा : 

स्मार्ट मीटर बसवा, नाहीतर लाईट बंद महावितरणकडून २४ तासांचा अल्टिमेटम

कार्डधारकांना फटका एनसीएमसी सक्तीमुळे एसटी प्रवाशांना भुर्दंड

मोठी बातमी शरद पवार रुग्णालयात दाखल, अचानक तब्येत बिघडली